गॅसवर गरम करावयास ठेवलेले दूध थाेडे दुर्लक्ष झाले की, उतू गेलेले तुम्ही पाहिले असेल! पाण्यालाही उकळी फुटते.पण, पाणी दुधाप्रमाणे वर येऊन उतू जात नाही, हे तुम्ही पाहिले असेल. तर मग दूध उतू का जाते, हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनाला पडला असेल! जेव्हा एखादा द्रव पदार्थ उकळताे, तेव्हा त्याचा काही अंश गरम वाफेच्या रूपात परावर्तित हाेताे. ही वाफ त्या द्रव पदार्थाच्या तुलनेत खूप हलकी असते.म्हणून ती बुडबुड्याचे रूप धारण करून भांड्याच्या काठापर्यंत वर येते. एखाद्या कारणामुळे जर बुडबुडा फुटला, तर वाफ हवेत मिसळून जाते. भांड्याच्या तळाच्या बाजूने बुडबुडे बनायची प्रक्रिया सुरू झाली की ताे पदार्थ उकळत आहे, असे आपण म्हणताे. दूध उकळल्यानंतर भांड्याच्या काठापर्यंत वर येते. पण, पाणी उकळल्यानंतर उतू जात नाही.कारण पाण्यामध्ये इतर काेणतेही पदार्थ मिसळलेले नसतात. पण, दुधात मात्र अनेक पदार्थ मिश्रित असतात. त्यातील काही उकळतात, तर काही उकळत नाहीत. दुधाच्या उकळणाऱ्या अंशामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. दुधामध्ये असे आणखी काही पदार्थ आहेत जे घनरूप धारण करतात. हे पदार्थ दुधातील पाण्याचे बुडबुडे या स्तरापर्यंत येतात.तेव्हा त्यांना अडथळा उत्पन्न हाेताे. हा अडथळा दूर करण्यासाठी बुडबुडे या वरच्या स्तराला धक्का देऊन वर फेकतात.त्यामुळेच दूध उकळताना उतू जाते.