काेकण किनारपट्टीसाठी केंद्राचा 460 काेटींचा आराखडा

    01-Dec-2020
Total Views |
चक्रीवादळामुळे हाेणारे नुकसान टाळण्यासाठी राबवणार उपाययाेजना
 
nhu_1  H x W: 0
 
सिंधुदुर्ग, 30 नाेव्हेंबर (वि.प्र.) : काेकण किनारपट्टी भागात चक्रीवादळामुळे हाेणारे नुकसान टाळण्यासाठी केंद्राने 460 काेटींचा आराखडा तयार केला आहे. त्यात बहुद्देशीय चक्रीवादळ आश्रयस्थाने, 471 कि.मी.चे भूमिगत केबलिंग व खारांचे बंधारे बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे भविष्यात काेकणात चक्रीवादळामुळे हाेणारे नुकसान टाळता येणे शक्य हाेईल. या आराखड्यात सिंधुदुर्गसह रत्नागिरी, पालघर, ठाणे व रायगड या 5 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.गेल्या काही महिन्यांत आलेल्या चक्रीवादळांमुळे व समुद्री उधाणांमुळे काेकणात माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक नागरिकांची घरे आणि बागायती उद्ध्वस्त झाली हाेती. यात काेट्यवधी रुपयांचे नुकसानही झाले. धूप प्रतिबंधक बंधारे नसल्याने समुद्राचे पाणी शेतात घुसून संपूर्ण शेतीचे नुकसान झाले. तसेच जमिनीची धूप झाली. याबाबत खासदार विनायक राऊत यांनी काेकण किनारपट्टीवर हाेणाऱ्या नुकसानीसाठी विशेष तरतूद करून कायमस्वरूपी उपाययाेजना राबवण्याची मागणी केंद्राकडे केली हाेती. राऊत यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, सर्व बाबींचा विचार करून केंद्राने राष्ट्रीय चक्रीवादळ जाेखीम शमन प्रकल्प (एनसीआरएमपी) तयार केला आहे. यात केंद्राकडून 460 काेटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये बहुउद्देशीय चक्रीवादळ आश्रयस्थाने, 471 कि.मी.चे भूमिगत केबलिंग व खारांचे बंधारे बांधण्यात येणार आहेत.सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे आणि रायगड अशा पाच जिल्ह्यांसह 700 कि.मी. किनारपट्टीसाठी हा प्रकल्प असणार आहे. यात केंद्राकडून 367.8, तर राज्य शासनाकडून 91.72 काेटींची तरतूद करण्यात येणार आहे. आयपीडीएस याेजनेंतर्गत यापूर्वी किनारपट्टीलगतच्या शहरी भागातील विद्युतविषयक कामे केली जात आहेत, परंतु त्यासाठी निधी कमी पडत हाेता. आता या प्रकल्पामुळे किनारपट्टीलगतच्या ग्रामीण भागातील कामेही करता येणार असून, त्यासाठी निधी अधिक प्रमाणात मिळणार आहे.