छाेट्यांचा किल्ला दिवाळीत महत्त्वाचा

09 Nov 2020 13:38:02

m,89_1  H x W:
 
सर्व गाेष्टींसाेबत आणखी एका गाेष्टीला महत्त्व असते ते म्हणजे किल्ला. दिवाळीसाठी किल्ला कसा बनवायचा ते जाणून घेऊया.
किल्ला तयार करण्यासाठी पहिल्यांदा जागा निश्चित करा.तुमच्या घराच्या गॅलरीत किंवा बिल्डिंगच्या गार्डनमध्ये सगळी दाेस्तमंडळी मिळून तुम्ही किल्ला बनवू शकता. किल्ला बनवताना आजूबाजूला थाेडीशी जागा राखून ठेवा. म्हणजे तुम्ही त्यावर रस्ता किंवा बगिचा तयार करू शकता.विटा, लाल माती किंवा शाडूची माती याची जुळवाजुळव थाेडीशी आधीच करून ठेवा.बिल्डिंगच्या गार्डनमधली माती तुम्ही वापरू शकता किंवा कुंभाराकडून ती विकत आणू शकता. जर विटांचा वापर तुम्ही करणार असाल तर मात्र तुम्हाला त्या खरेदीच कराव्या लागतील.किल्ला बनवण्याची सुरुवात करताना सर्वप्रथम या किल्ल्यांचा पाया मजबूत करून घ्या. यासाठी तुम्ही दगड माती आणि विटा एकमेकांवर रचून मजबूत पाया तयार करा. पण त्याआधी लाल माती पाण्यात भिजवून चांगली मळून घ्या. माती आणि दगडांचा वापर करून हळूहळू किल्ल्यांना मनपसंत आकार द्या.त्यात तुम्ही छाेटी, छाेटी भुयारं, घरं, खिडक्या, दारं, बुरूज बनवू शकता. बांधकाम झालं की मग भिंतींना त्या मळलेल्या मातीनेच मुलामा द्या आणि एक दिवस तरी त्यांना तसेच ठेवा.
दुसऱ्या दिवशी या भिंतींना आवडत्या रंगाने रंगवा. काडीपेटीच्या काड्यांचा वापर करून किल्ल्याची तटबंदी करा. उरलेल्या जागेत मेथी, माेहरी, गहू पेरा. चार पाच दिवसांनी त्याची छाेटी छाेटी राेपं तयार हाेतील.त्यामुळे आपला किल्ला खूपच आकर्षक दिसेल. किल्ल्याला नवे आधुनिक रंगरूप द्यायचे असेल तर साध्या रंगाने रंगवलेल्या भिंतीवर छान डिझाईनपण काढू शकता.यासाठी शाळेत चित्रकलेत वापरतात तसे रंग वापरा.किल्ल्याच्या रस्त्यावर छाेटी छाेटी वाहनेही ठेवू शकता. यामुळे आपला किल्ला अगदी आपल्या शहराच्या जवळचा वाटेल.किल्ला तयार झाल्यावर दिवाळी संपेपर्यंत त्याचं संरक्षण करणे हेदेखील महत्त्वाची गाेष्ट आहे. यासाठी तर आपले मावळे सदैव तत्पर असतात.आपल्याला हव्या असणाऱ्या या मावळ्यांच्या बाहुल्याही बाजारात विकत मिळतात. त्या आपल्याला हव्या तिथे किल्ल्यावर उभ्या कराव्यात म्हणजे शत्रूसुद्धा आपल्या किल्ल्याकडे नजर वर करून बघणार नाहीत.
अशा या सुंदर किल्ल्यावर रात्री आईला किंवा ताईला छाेटेसे दिवे ठेवायला सांगा. आपण इतक्या मेहनतीने तयार केलेला किल्ला दिव्याच्या प्रकाशात उजळून निघालेला असताे.
Powered By Sangraha 9.0