फ्लॅट खरेदीवेळी ही शहानिशा करा

    30-Nov-2020
Total Views |
ताबा दिल्यानंतर त्या प्राेजेक्टमध्ये बिल्डर नक्की काय करणार, हे करार करताना पडताळून पाहा. यामुळे जमीन मालकीहक्काविषयी निश्चितता मिळते.
 
mju_1  H x W: 0
 
काेणत्याही व्यक्तीच्या जीवनात फ्लॅट खरेदी ही सर्वांत महाग बाब असते.काेणताही फ्लॅट काही लाखांच्या आत येत नाही. त्यामुळे फ्लॅट घेताना फार काळजी घेणे आवश्यक असते. फ्लॅटबाबत 70 ते 80 टक्के ग्राहक प्रत्यक्ष बिल्डरला न भेटताच अंतिम निर्णय घेतात.सेल्स टीमसाठी एक विशिष्ट मर्यादा असते. त्याच्याखाली ते डील देऊ शकत नाहीत. पण थेट बिल्डरसाेबत भेट घेऊन अजून वाटाघाटी केल्या तर अधिक चांगले डील मिळू शकते. बऱ्याच वेळा बिल्डर आपला प्राेजेक्ट एखाद्या ब्राेकिंग एजन्सीकडे मार्केटिंगसाठी देतात आणि त्यांना एक मूलभूत किंमत निश्चित करून दिलेली असते. अशा स्थितीत एका तृतीय संस्थेमार्फत व्यवहार केला जात असताे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काही वेळेस विविध आश्वासने दिली जातात. अशा वेळी सर्व चर्चा आणि संभाषण ई-मेल किंवा लिखित स्वरूपात घ्यावे, ज्यामध्ये बिल्डरांना अंतर्भूत करावे. ताबा दिल्यानंतर त्या प्राेजेक्टमध्ये बिल्डर नक्की काय करणार, हे करार करताना पडताळून पाहावे म्हणजे गृहनिर्माण संस्था किंवा अपार्टमेंट डीड आदी. यामुळे जमीन मालकीहक्काविषयी निश्चितता मिळते. नियम व अटी काळजीपूर्वक वाचाव्यात, नाहीतर दिलेल्या सवलती आणि सुविधा वापरण्यासाठी कदाचित पैसे द्यावे लागतील.टेरेसचे (गच्ची) हक्क काही बिल्डर राखीव ठेवतात. त्यामुळे भविष्यात हाेर्डिंग आणि माेबाइल कंपनीचे टाॅवर सहन करावे लागतात आणि त्याच्यातून मिळणारे उत्पन्न कायमस्वरुपी बिल्डरला मिळत राहते.त्यामुळे करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी या गाेष्टीची पडताळणी जरूर करावी. बऱ्याच वेळेस बिल्डर प्राेजेक्टमध्ये व्यावसायिक अधिकार राखून ठेवतात, त्यामुळे भविष्यात बाहेरील व्यक्ती तुमच्या प्राेजेक्टमध्ये येऊ शकताे किंवा काही गाेष्टींच्या वापरावर मर्यादा येऊ शकतात आणि त्यासाठी अधिक पैसे देखील माेजावे लागू शकतात. त्यामुळे असा उल्लेख असल्यास करारामध्ये बदल करून घ्यावेत. मूलभूत गरजा आणि त्यासाठीचे प्रयाेजन नक्की जाणून घ्या. पाणी, वीज, रस्ता आदी गाेष्टी राेजच्या दैनंदिन जीवनात अतिमहत्त्वाच्या आहेत. याबद्दल बिल्डरकडून ताेंडी आश्वासने दिली गेली असल्यास सुजाण ग्राहक या नात्याने सर्व गाेष्टींची शहानिशा करूनच अंतिम निर्णय घ्यावा.