राेज नवे शिकायला मिळणारे ठिकाण म्हणजे रंगभूमी

    28-Nov-2020
Total Views |
 
./;_1  H x W: 0
 
पुणे, 27 नाेव्हेंबर (आ.प्र.) ः रंगभूमीवर किंवा नाट्यगृहातील रंगमंचावर आलं की मला इलेक्ट्रीफाइंग झाल्यासारखं वाटतं. आजही ते फिलिंग आहे.कारण, राेज स्वत:ला नवं काही तरी शिकण्याची संधी जेथे मिळते, ते ठिकाण म्हणजे रंगमंच किंवा रंगभूमी हाेय. त्यामुळे प्रत्येकाने नाटक करायला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी विक्रम गाेखले यांनी केले. ‘नटखट’ असा उल्लेख करत ज्या नटांना कधीच असुरक्षित वाटत नाही त्यापैकी एक म्हणजे माेहन जाेशी, असे गाैरवाेद्गारदेखील गाेखले यांनी काढले.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, काेथरूड शाखेच्या वतीने यशवंत वेणू पुरस्कार दरवर्षी दिले जातात. यावर्षी अभिनेते माेहन जाेशी व त्यांच्या पत्नी ज्याेती जाेशी यांना या पुरस्काराने गाैरवण्यात आले. ज्येष्ठ रंगकर्मी विक्रम गाेखले आणि अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह वर्धापन दिन आणि यशवंतराव स्मृती दिनाचे औचित्य साधून बुधवारी (25 नाेव्हेंबर) हा कार्यक्रम झाला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला मराठी उद्याेजक अमित गाेखले, शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार, नाट्यपरिषदेच्या काेथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, समीर हंपी, प्रवीण बर्वे, सत्यजित धांडेकर, दीपक गुप्ते आदी व्यासपीठावर उपस्थित हाेते.या कार्यक्रमात काेराेनाच्या काळात विशेष कार्य करणाऱ्या पुण्यातील विविध क्षेत्रांतील परिचारिका माधुरी गायकवाड, सफाई कामगार सागर निकम, वैकुंठ स्मशानभूमीतील विलास अडागळे, कलाकारांना मदत करणारे धनंजय पूरकर यांचा काेराेना याेद्धे म्हणून खास सन्मान करण्यात आला. तसेच कार्यक्रमासाठी चव्हाण नाट्यगृहाची देखभाल करणाऱ्या महापालिकेच्या उपायुक्त रंजना घुगे, रंगमंदिरांचे व्यवस्थापक सुनील मते यांचाही विशेष गाैरव करण्यात आला.सत्काराबद्दल बाेलताना माेहन जाेशी यांनी लहानपणापासूनच्या आठवणींना उजाळा दिला. राजन माेहाडीकर याच्याऐवजी ‘टुणटुण नगरी खणखण राजा’ या बालनाट्यात रंगमंचावर पाऊल ठेवले तेंव्हापासूनचा हा प्रवास आहे, असे सांगून ते म्हणाले, की या पुण्याने मला उत्तम बालपण दिले, गुरुजन दिले, उत्तम मित्र दिले, नाटकं दिली, उत्तम दिग्दर्शक दिले, मला स्थैर्यही दिले.त्यानंतर करिअर करायला मी मुंबईत गेलाे. पुण्याच्या स्थैर्यामुळे मला मागे वळून बघण्याची वेळ आयुष्यात कधीच आली नाही. प्रशांत दामले म्हणाले, की मी 12 मार्च 2020 या दिवशी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या रंगमंचावर उभा हाेताे.
त्यानंतर आज उभा आहे. आजचा कार्यक्रम हा नवी ऊर्जा देणारा आहे. पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर हे जर सचिन तेंडुलकर असेल तर यशवंतराव चव्हाण नाट्यगृह हे विराट काेहली आहे.