ठाण्यातील संपूर्ण आराेग्य यंत्रणा अद्ययावत ठेवा

    26-Nov-2020
Total Views |
महापालिका अधिकाऱ्यांना आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्या आढावा बैठकीत सूचना
 
m,io_1  H x W:
 
ठाणे, 25 नाेव्हेंबर (आ.प्र.) : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काेराेनाचा सामना करण्यासाठी ज्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे, त्या सर्व सुविधा अद्ययावत ठेवण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.नागरी संशाेधन केंद्रात काेराेनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या सुविधांच्या आढावा बैठकीत आयुक्त बाेलत हाेते. सद्यस्थितीत काेराेनाचा संसर्ग कमी असला, तरी काेराेनाची दुसरी लाट येणाच्या अनुषंगाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवणे गरजेचे असून, सर्व रुग्णालये अद्ययावत ठेवण्याच्या सूचना त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. काेराेनाबाधितांची संख्या अचानक वाढल्यास प्रशासनावर ताण येऊ नये, तसेच नागरिकांची काेणत्याही प्रकारची गैरसाेय हाेऊ नये यासाठी आतापासूनच संपूर्ण आराेग्य यंत्रणा सज्ज ठेवावी.रुग्णवाहिका, ऑक्सिजनचा याेग्य पुरवठा, ऑक्सिजन सुविधायुक्त खाटा, अँटिजेन व आरटी-पीसीआर चाचण्या करणे, तसेच औषधांचा साठा करून ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी आराेग्य विभागास दिल्या.
शहरात मास्क न वापरणाऱ्या, तसेच साेशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार असून, येत्या 10 दिवसांत विशेष माेहीम राबवण्यात येणार आहे. शहरातील साफसफाईकडे दुर्लक्ष न करता प्रभाग समितीनिहाय राेज परिसर साफसफाई, रस्ते, सार्वजनिक शाैचालयांच्या साफसफाईच्या सूचना त्यांनी सहाय्यक आयुक्तांना दिल्या.ठाणे महापालिकेच्या वतीने शाळेतील 70 टक्के शिक्षकांच्या आरटी-पीसीआर चाचण्या पूर्ण झाल्या असून, उर्वरित चाचण्याही तात्काळ पूर्ण कराव्यात. येत्या काळात लसीकरण करण्यासाठी संपूर्ण आराेग्य सेवकांची माहिती अद्ययावत ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी आराेग्य विभागास दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त (1) गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाडे आदी उपस्थित हाेते.