नवी मुंबईत रेल्वे स्थानकांवरही काेराेना चाचण्या; महापालिकेची पथके कार्यान्वित

    25-Nov-2020
Total Views |
 
,m_1  H x W: 0
 
नवी मुंबई, 24 नाेव्हेंबर (आ.प्र.) : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी नवी मुंबई महापालिका विविध याेजना राबवत असून, संबंधित सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. मिशन ब्रेक द चेन-2 माेहीम अधिक जागरूकपणे राबवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या असून, त्याअंतर्गत आता एपीएमसी मार्केट व एमआयडीसी क्षेत्राबराेबरच रेल्वे स्थानकांवरही काेराेना तपासणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.जलद रुग्णशाेध करण्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या असून, काेराेना चाचण्यांची संख्याही वाढवण्यात येत आहे. राेज 4 हजारांहून अधिक चाचण्या करण्याचे लक्ष्य प्रशासनास देण्यात आले आहे. त्या दृष्टीने रेल्वे स्थानकांतून बाहेर पडत नवी मुंबई महापालिका क्षेत्रात येणाऱ्या स्थानकांवरील निर्गमनाच्या जागांवर पालिकेची आराेग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. सकाळी 8 ते 1 या वेळेत ही आराेग्य पथके नागरिकांची चाचणी घेणार आहेत. एका पथकात 6 जणांचा समावेश आहे. बेलापूर, नेरुळ आणि वाशी या तीन स्थानकांवर चाचणी केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. यात प्रामुख्याने आरटी-पीसीआर चाचणीवर भर देण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी 400 हून अधिक नागरिकांची अँटिजेन, आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली.उर्वरित रेल्वे स्थानकांवरही आराेग्य पथके कार्यान्वित करून चाचण्या केल्या जाणार जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने शिक्षकांच्या चाचण्याही सुरू करण्यात आल्या हाेत्या.त्यात 1195 शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या असून, त्यातील 17 शिक्षकांच्या चाचण्यांचे निदान पाॅझिटिव्ह आले. तथापि, आता शाळा 31 डिसेंबरनंतर सुरू हाेणार असल्याने त्यावेळी पुन्हा चाचण्या केल्या जाणार आहेत.एपीएमसी हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र असल्याने तेथे सुरुवातीपासूनच विशेष लक्ष देण्यात येत आहे. कांदा, बटाटामधील स्थायी सेंटरप्रमाणे मसाला, दाणा बाजार, फळ, भाजीपाला अशा एकूण पाचही मार्केटमध्ये असलेली चाचणी केंद्रे अधिक प्रभावीपणे कार्यन्वित करण्यात आली आहेत, तसेच एमआयडीसीतील कंपन्यांमध्येही चाचण्या करण्यात येत आहेत.