अ‍ॅनिमेशन म्हणजे काय?

    21-Nov-2020
Total Views |
 
mji_1  H x W: 0
 
आपल्याकडे प्राचीन काळापासून लाेककलांमध्ये कळसूत्री बाहुल्या, बाेलक्या बाहुल्यांचा समावेश आहेच. आजच्या काळातील आधुनिक राेबाेटिक सायन्स, अ‍ॅनिमेशन यांची बीजे अशाच लाेककलांमध्ये दडलेली आहेत. अ‍ॅनिमेशनचे तंत्रज्ञान आधुनिक असले तरी त्यासाठी आवश्यक असलेली प्रतिभा भारतीयांमध्ये अंगभूतच आहे. यामुळेच आज जागतिक स्तरावर अ‍ॅनिमेशन क्षेत्रात भारतीयांची घाेडदाैड अतिशय वेगाने सुरू आहे.हाॅलिवूड चित्रपटांमधील अ‍ॅनिमेशनचे बरेचसे काम भारतात केले जाते. अ‍ॅनिमेशन हा शब्द अ‍ॅनिमा या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ आहे प्राण. एखाद्या निर्जीव वस्तूत प्राण ओतून ती जिवंत करणे हे त्यातून प्रतीत हाेते. अ‍ॅनिमेशनची नेमकी व्याख्या करायची असल्यास हलणारी चित्रे अशी करता येईल. अगदी खऱ्या जगासारखे एक आभासी जग निर्माण करून प्रेक्षकांना त्यात खेचून घेणे ही जादू अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून साकारली जाते. एका सेकंदात 24 चित्रे पडद्यावर एकामागून एक अशी वेगाने सरकवली गेल्यास त्या चित्रामध्ये हालचाल हाेत असल्याचा आभास निर्माण हाेताे. ताे दृष्टीभ्रम असताे. त्या चित्रांना ध्वनीची जाेड मिळाली, तर पडद्यावरची चित्रे जिवंत हाेतात. अ‍ॅनिमेशन हे दृकश्राव्य माध्यम आहे. अ‍ॅनिमेशनचे अनेक प्रकार असतात, पण मुख्य दाेन प्रकार म्हणजे ट्रॅडिशनल अ‍ॅनिमेशन (पारंपरिक) आणि सीजी अ‍ॅनिमेशन (कंप्युटर जनरेटेड अ‍ॅनिमेशन) पारंपरिक अ‍ॅनिमेशनमध्ये एका सेकंदाला 24 फ्रेम या दराने प्रत्येक चित्र हाताने रेखाटले जाते व त्या चित्रांचे फिल्ममध्ये रूपांतर केले जाते. हे काम अत्यंत अवघड आणि चिकाटीचे आहे. आजदेखील काही खास प्रकल्पांमध्ये पारंपरिक अ‍ॅनिमेशनचा आवर्जून वापर केला जाताे. कंप्युटर जनरेटेड अ‍ॅनिमेशनमध्ये टूडी अ‍ॅनिमेशन आणि थ्रीडी अ‍ॅनिमेशन असे दाेन प्रकार आहेत. याशिवाय स्टाॅप माेशन, क्लेमेशन, पपेट अ‍ॅनिमेशन, कटआउट अ‍ॅनिमेशन असे इतरही प्रकार आहेत.