नवी दिल्ली, 20 नाेव्हेंबर (वि.प्र.) : नुकसान झाल्याशिवाय एखाद्या इंद्रियाचे महत्त्व आपल्याला कळत नाही. मानवी जीवनात ज्ञानेंद्रियांवर सर्व व्यवहार सुरू असतात.कान हे त्यातील एक. समाेरची व्यक्ती काय सांगते आहे याची जाणीव कानांमुळे हाेते आणि त्याला उत्तर देता येते. पण हे झाले सर्वसामान्यांबाबत. कर्णबधिर असलेल्यांची समस्या वेगळीच आहे. त्यांना मुळात ऐकू येत नसल्यामुळे त्यांच्याबराेबर बाेलण्याचा प्रश्न नसताे.पण ओठांच्या हालचाली आणि हातांच्या खुणांनी त्यांच्याबराेबर संवाद साधता येताे. त्याला ‘साइन लँग्वेज’ म्हणतात. म्हणजे खुणांची भाषा.पण काेराेनामुळे आणखी एक समस्या या लाेकांपुढे आली आहे. ती आहे मास्कची. संसर्ग राेखण्यासाठी मास्क वापरणे अनिवार्य असल्यामुळे सगळे लाेक सध्या ताेंड झाकलेल्या अवस्थेत असतात. कर्णबधिरांची समस्या येथेच सुरू हाेते. मास्कमुळे ओठ दिसत नाहीत आणि बाेलताना त्यांची हालचाल समजत नसल्यामुळे समाेरच्या व्यक्तीच्या बाेलण्याचा अंदाज घेता येत नाही. एका बिगर सरकारी संघटनेत कर्णबधिरांसाठी काम करणारे दीपक शहरावत यांनी या समस्येवर मात करण्यासाठी खुणांच्या भाषेचा उपयाेग करणे शिकवायला प्रारंभ केला आहे. म्हणजे ओठांची हालचाल कळाली नाही, तरी खुणांमुळे म्हणणे समजू शकते. अनेक कंपन्यांमध्ये असे लाेक काम करत असल्यामुळे तेथील बैठकांमध्ये काय बाेलणे चालले आहे हे समजण्यास त्यांना मदत हाेत असल्याचा शहरावत यांचा अनुभव आहे. पण या उपायामुळे समस्या सुटल्याचे म्हणता येत नाही. ऋषी यांचे उदाहरण पाहा. एका बिगर सरकारी संघटनेत ते आयटी इंजिनिअर आहेत.