चिखलीतील 50 एकर जागेवर उभा राहणार तुरुंग

    21-Nov-2020
Total Views |
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी विधानसभेत दिलेली माहिती
 
 
jkm_1  H x W: 0
 
पुणे, 20 नाेव्हेंबर (आज का आनंद न्यूज नेटवर्क, पुणे) : क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी असलेल्या येरवडा मध्यवर्ती कारागृहातील ताण कमी करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाऊ लागली आहेत. राज्य सरकारने चिखली येथे पन्नास एकर जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी कारागृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.यासंदर्भात खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी सन 2020-21 च्या अर्थसंकल्पीय मागण्यांवर कपात सूचना उपस्थित केली हाेती. त्यावर राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्याचा संदर्भ घेत आमदार तापकीर यांनी माहिती कळविली आहे. येरवडा कारागृहातील बंद्यांची गर्दी कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात नवीन कारागृहाचे बांधकाम करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील चिखली या गावातील गायरानामधील 50 एकर जागा निश्चित करून जागेची चतु:सीमा, जागेचा 7/12 उतारा आणि इतर कागदपत्रांची माहिती येरवडा कारागृह प्रशासनाला द्यावी. तसेच कारागृहासाठी जागा आरक्षित करण्याबाबतचे बंधपत्र देऊन जागा उपलब्ध हाेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत असल्याचे गृहराज्यमंत्री पाटील यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदी (कैदी) क्षमता 2449 असताना आजमितीस कारागृहात दाखल बंदींची संख्या 5800 असून, येरवडा कारागृहात आणि सुधारगृहात प्रत्येक कैद्याला झाेपण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही.तसेच सध्या प्रत्येक कैदी हा फक्त 1.17 ते 1.19 चाै.मी. जागेत दाटीवाटीने वास्तव्य करीत आहे.एकमेकांच्या संपर्कामुळे दाेन हजार 193 कैद्यांना त्वचाराेगाने ग्रासले असल्याचे निदर्शनास आले आहे.येरवडा कारागृहातील बरॅक्सची संख्या वाढविण्यासाठी आणि येरवडा कारागृहाच्या धर्तीवर स्वतंत्र कारागृहाची निर्मिती करण्यासाठी शासनाने कार्यवाही करण्याची मागणी आमदार तापकीर यांनी केली हाेती.