औरंगाबाद, 19 नाेव्हेंबर (आ.प्र.) : घनकचरा व्यवस्थापनाच्या कामासाठी राज्य शासनाने महापालिकेला नुकताच 31 काेटी 75 लाख रुपयांचा निधी दिला आहे. यापैकी 15 काेटी 75 लाख रुपये घनकचरा व्यवस्थापनासाठी आणि 16 काेटी रुपये हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी देण्यात आले आहेत. कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेच्या 148 काेटींच्या सुधारित सविस्तर प्रकल्प आराखड्याला (डीपीआर) मंजुरी दिल्यावर निधीही उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून चिकलठाणा, पडेगाव येथे प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम केले जात आहे. चिकलठाण्यातील प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, पडेगावचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. या भागातील नागरिकांच्या विराेधामुळे हे काम रखडले हाेते; पण आता हा प्रकल्प डिसेंबरमध्ये सुरू हाेईल, असे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. राज्य शासनाने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला नव्याने 31 काेटी 75 लाखांचा निधी दिला आहे. महापालिकेला हा निधी प्राप्त झाला असून, पंधराव्या वित्त आयाेगाच्या माध्यमातून हा निधी प्राप्त झाल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशाेर भाेंबे यांनी दिली.