कसा हाेताे माेबाईल लहरींचा प्रवास

    10-Nov-2020
Total Views |
भ्रमणध्वनीचे तंत्र विद्युत चुंबकीय रेडिओ लहरी वापरून संदेश वहन करते. आपण जेव्हा भ्रमणध्वनी संचात बाेलताे तेव्हा प्रथम ध्वनीलहरींचे विद्युत संकेतांमध्ये रूपांतर हाेते.
 
mmuu_1  H x W:
 
साधा फाेन व माेबाईलचे काम सारखेच असले तरी दूरध्वनी आणि भ्रमणध्वनीच्या तंत्रात मूलभूत फरक आहे. दूरध्वनीचे संदेश तारा, बटणे, उपग्रह, टेलिफाेन कार्यालये या सगळ्या जडजंबालातून प्रवास करतात तर भ्रमणध्वनीचे तंत्र विद्युत चुंबकीय रेडिओ लहरी वापरून संदेश वहन करते. आपण जेव्हा भ्रमणध्वनी संचात बाेलताे तेव्हा प्रथम ध्वनीलहरींचे विद्युत संकेतांमध्ये रूपांतर हाेते. संचातील एक सूक्ष्म चकती या संकेतांचे संख्यात्मक साखळीमध्ये रूपांतर करते. या संख्यात्मक साखळीचे रेडिओ लहरी रूप लहरीच्या स्वरूपात संचामधून बाहेर पडते. प्रकाशाच्या वेगाने जाणाऱ्या या लहरी सगळ्यात जवळचे भ्रमणध्वनीचे ग्रहणस्थान गाठतात. ग्रहणस्थानातून या लहरी नजीकच्या स्थानकाकडे पाेचवल्या जातात आणि तिथून अवकाशात साेडल्या जातात. ईप्सित स्थळाजवळील स्थानक या लहरी ग्रहण करते आणि याेग्य त्या संचापर्यंत पाेचवते. ठरावीक वारंवारितेच्या लहरी वापरून चालणारे वाॅकी टाॅकी संच फक्त त्याच लहरी पकडू शकतात आणि प्रक्षेपित करू शकतात. भ्रमणध्वनी संचामध्ये रेडिओ प्रक्षेपक आणि ग्राहक असतात, ते रेडिओ लहरींचे आदानप्रदान करतात. या लहरींची वारंवारिता कमी असल्याने त्यांच्याकडे फक्त जवळच्या ग्रहणस्थानापर्यंत पाेचण्यासाठी आवश्यक तेवढीच शक्ती असते. कमी शक्तीच्या लहरी ग्रहण करून उच्च शक्तिशाली अँटेनामार्फत या लहरी पुढे पाठवण्याचे काम करते. प्रत्येक संचामधून येणाऱ्या लहरींच्या वारंवारितेमध्ये थाेडातरी फरक असला तरच त्या एकमेकांत न मिसळता पाहिजे तिथेच पाेचतील. पण लक्षावधी लाेकांना अशा वेगवेगळ्या वारंवारिता ठरवून देणे अशक्यप्राय आहे. याच्यावर उपाय म्हणून शहरांचे ठरावीक वारंवारिता संच निश्चित केलेले षटकाेनी खण पाडतात. प्रत्येक खणामध्ये ग्रहणस्थाने आणि स्थानक असते, जे त्या त्या खणात येणारे आणि जाणारे संदेश हाताळतात.समजा गाडीतून फिरत असताना गाडीतील माणसाला जर कुणाशी बाेलायचे असेल, तर त्याला निर्विघ्नपणे बाेलता येण्यासाठी त्याच्या भ्रमणध्वनीचा संपर्क असणारे ग्रहणस्थान आपाेआप बदलत जाते.कारण संचामध्ये सगळ्यात जवळचे ग्रहणस्थान शाेधण्याची यंत्रणा कार्यान्वित असते. संचातून बाहेर पडणाऱ्या लहरींची ताकद मर्यादित असल्याने जर आपला संच जवळच्या ग्रहणस्थानाच्या कक्षेबाहेर गेला आणि जवळ दुसरे ग्रहणस्थान नसेल तर आपला संवाद तुटताे.