काेणत्याही निर्णयापूर्वी संपूर्ण विचार महत्त्वाचा!

    29-Oct-2020
Total Views |
आयुष्यात अनेक आव्हानांना ताेंड द्यावे लागते. त्यात निर्णय घेणे हे एक माेठे आव्हान असते आणि तेथेच बहुसंख्य लाेकांचा गाेंधळ हाेताे. चांगला निर्णय घेण्यापेक्षा ताे कधी घ्यावा हे समजणे महत्त्वाचे असते, त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे काेणता निर्णय केव्हा घेऊ नये हे समजणे. सहसा चार मानसिक स्थितीत निर्णय घ्यावे लागतात. पण ते याेग्य वेळी घेतले, तर त्यांचा लाभ हाेताे. निर्णय करताना सर्वंकष विचार महत्त्वाचा असताे. काेणत्या परिस्थितीत काेणते निर्णय केल्यामुळे काय घडते याचे मार्गदर्शन ‘महाभारता’तून मिळते. 
 
n67_1  H x W: 0
 
 
संध्यानंद.काॅम
मनाएवढी चंचल गाेष्ट जगात दुसरी नाही. ते क्षणभरही स्थिर नसते. कधी ते भूतकाळात जाते, तर कधी भविष्याचा वेध घेऊ पाहते. त्याच्यासाेबत जगताना प्रत्येकाला त्याचा अनुभव येत असताे. मनाच्या या चंचलतेचा फटका बसताे ताे निर्णयप्रक्रियेला. काेणताही निर्णय घेताना कसलाही गाेंधळ न हाेणारे फार थाेडे लाेक असतील.बहुसंख्य लाेकांना काेणताही निर्णय घेताना ताण येताे आणि मानसिक स्थिती दाेलायमान हाेते. पण निर्णय घेणे भाग असते. कधी ताे त्वरित करावा लागताे, तर कधी त्यासाठी हाती थाेडा वेळ असताे. निर्णय करणे एकवेळ साेपे असले, तरी ताे काेणत्या परिस्थितीत करू नयेत, हे समजणे सर्वांत महत्त्वाचे असते, हे ‘महाभारता’तील या प्रसंगांवरून स्पष्ट हाेते.
 
भीतीतून घेतलेले निर्णय
 
कासवाच्या पाठीवरील अभेद्य कवच त्याचे रक्षण करते. पण कासव पाठीवर पडले, तर त्याचे कवच निरुपयाेगी ठरते. भीतिपाेटी निर्णय घेणाऱ्या व्यक्तीचे असे हाेते. अशी व्यक्ती हट्टीपणाने अचानक निर्णय करते. पांडवांनी घेरल्यावर अश्वत्थाम्याने भीतिपाेटी ब्रह्मास्त्रासारख्या विनाशकारी अस्त्राचा प्रयाेग केला. स्वत:च्या सुरक्षेच्या भीतीमुळे त्याने हा निर्णय घेतला हाेता. पण या अस्त्राच्या प्रयाेगामुळे पांडवांमध्ये भीती निर्माण हाेऊन त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. म्हणजे भीतिपाेटी घेतलेले निर्णय अयाेग्य ठरतात, हे या उदाहरणातून दिसते. अश्वत्थाम्याने भीतीपाेटी घेतलेल्या निर्णयाचे दुष्परिणाम अख्ख्या कुरुकुलाला भाेगावे लागले. स्वत: अश्वत्थामाही युगानुयुगे तडफडत राहिला. 
 
दृढ संबंधांतून केलेले निर्णय
 
एखाद्या खुंटीवर लटकाविलेला कपडा जाेरात ओढला, तर ताे फाटताे. खुंटी आणि कपडा एकमेकांना अगदी चिकटून असल्यामुळे हे घडले. एखाद्याबराेबर असलेल्या दृढ संबंधांमुळे आपण घेतलेले निर्णय अनेकदा धाेकादायक ठरतात, हे या उदाहरणातून सांगावयाचे आहे. ‘महाभारता’तील कर्णाचा प्रत्येक निर्णय त्याचा मित्र दुर्याेधनाबराेबरच्या संबंधांबराेबर जाेडलेला हाेता. मात्र त्यात धर्म आणि मैत्रीमध्ये कर्णाची स्थिती द्विधा झाली.खुंटीचे उदाहरण घेतले, तर दुर्याेधनाबराेबरच्या मैत्रीमुळे कर्ण धर्माला न्याय देऊ शकला नाही असे दिसते.
 
दु:खात घेतलेले निर्णय
 
टिपकागदावर सांडलेल्या शाईचा एक थेंब सगळ्या कागदावर पसरताे, त्याचप्रमाणे दु:खात घेतलेल्या एखाद्या निर्णयाचे परिणाम आयुष्यभर हाेऊ शकतात. ‘महाभारता’तील गांधारीचे तसेच झाले. तिने कुंती आणि कृष्ण यांच्याबाबत आयुष्यभर चुकीची समजूत करून घेतली आणि त्याचे परिणाम सहन केले. त्यामुळे दु:खात असताना काेणताही निर्णय घेताना विचार करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट हाेते. 
 
आनंदात असताना केलेले निर्णय
 
एखाद्या विनाेदामुळे काही वेळा हसून डाेळ्यांत पाणी येते. पण त्याचा अर्थ संबंधिताचा ताेल सुटला असाही हाेताे. पण परिस्थितीचे भान आणि समताेल कधी विसरता कामा नये. अत्यंत आनंदात असताना अनेक निर्णय घेतले जातात आणि त्या वेळी वस्तुस्थितीचा विसर पडताे हे विसरता कामा नये. त्यामुळे समताेल मन:स्थितीत असताना निर्णय करणे याेग्य. ‘महाभारता’तील राजा विराटाचे असे झाले. त्याचा मुलगा उत्तरा याने काैरवांच्या सैन्याचा पराभव केल्याचे वृत्त समजल्यावर आनंदाने हुरळलेल्या राजाने युधिष्ठिराच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले, त्याचा अवमानही केला. पण अतिआनंदात असताना केलेले निर्णय अंती दु:खाकडे नेतात हे लक्षात ठेवा.