पिंपरीत मेट्राेच्या रुळांचे काम पूर्ण

    29-Oct-2020
Total Views |
महामेट्राेची माहिती : मेट्राेच्या चाचण्या पुन्हा सुरू
 
पिंपरी, 28 ऑक्टाेबर (आ.प्र.) : पिंपरी ते दापाेडीदरम्यानच्या साडेसात कि.मी. मार्गावरील दाेन्ही बाजूंचे (अपडाउन) रुळांचे काम महाराष्ट्र मेट्राे रेल्वे काॅर्पाेरेशनने (महामेट्राे) नुकतेच पूर्ण केले. हे काम पूर्ण झाल्याने येत्या महिनाअखेरपासून संत तुकारामनगर ते फुगेवाडीदरम्यानच्या प्राधान्य मार्गावर मेट्राेच्या चाचण्यांना पुन्हा सुरुवात केली जाणार आहे.पिंपरीतील मेट्राे मार्गांवर रूळ टाकण्याचे काम गेल्या वर्षीपासून सुरू झाले हाेते.खराळवाडीतून कामाला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात काम वेगात पूर्ण करण्यात आले. मात्र, नाशिक फाट्यासह आणखी काही भागांत मेट्राेच्या मार्गिकेचे काम अपूर्ण असल्याने तेथे महामेट्राेला रूळ टाकता येत नव्हते. फेब्रुवारी-मार्चदरम्यान कामाने वेग पकडला असतानाच, काेराेनामुळे मेट्राेचे काम ठप्प झाले. लाॅकडाऊननंतर श्रमिकांच्या कमतरतेमुळे मेट्राेच्या कामाला पुन्हा गती मिळण्यास थाेडासा विलंब झाला.नाशिक फाटा येथील काम दाेन महिन्यांपूर्वी पूर्ण झाल्यानंतर रूळ टाकण्याचे आणि इतर सेवांचे काम तातडीने पूर्ण करण्यात आले, तसेच फुगेवाडीपासून दापाेडीपर्यंतची मार्गिका तयार झाल्याने तेथेही रूळ टाकण्याचे काम पूर्ण केले गेले.पिंपरी-चिंचवड ते दापाेडीदरम्यानचा मेट्राेचा मार्ग साडेसात कि.मी.चा असून, तेथे अप-डाउन अशा दाेन्ही बाजूंसाठी 15 कि.मी.चे रूळ टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले. संत तुकारामनगर ते फुगेवाडीदरम्यान रुळांसह विद्युतीकरणाची सर्व कामेही पूर्ण झाली असून, सिग्नल यंत्रणेची कामेही अखेरच्या टप्प्यात आहेत.
त्यामुळे पुढील काही दिवसांत या दाेन्ही स्थानकांदरम्यान पुन्हा मेट्राेची चाचणी घेण्यात येणार असल्याचे महामेट्राेने स्पष्ट केले. तेथील स्थानकांच्या कामांना गती देण्यात आली आहे.