या शिक्षकांनी कृतीतून सांगितले शिक्षणाचे महत्त्व

    25-Oct-2020
Total Views |
बालकांच्या जडणघडणीत शिक्षकांची जबाबदारी फार माेठी असते.केजीपासून शाळेत गेलेले मूल माेठेपणी शिक्षण संपेपर्यंत शिक्षकांकडून सतत काही ना शिकत असते. त्यामुळे असेल कदाचित; पण सगळ्या मुलांच्या मनात शिक्षकांविषयी आदरभावच असताे. लाॅकडाऊन आणि महामारीमुळे सध्या शैक्षणिक संस्था बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यात अनेक अडचणी येत असल्या, तरी शिक्षकांनी त्यावर मार्ग काढून आपले काम सुरू ठेवले आहे. काहींनी त्यासाठी पदरमाेडसुद्धा केली आहे. सध्याच्या या स्थितीत हे प्रयत्न उभारी देणारे आहेत. शिक्षकांबाबत या काही ‘गुड न्यूज’ वाचा...
 
 
m,i9_1  H x W:
संध्यानंद.काॅम
ईशान्य भारतातील मणिपूर हे छाेटेसे राज्य निसर्गसाैंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.पण त्याचबराेबर हे राज्य प्रवासासाठी दुर्गमसुद्धा आहे. पण इच्छाशक्ती असल्यावर सगळ्या विपरीत स्थितीतून मार्ग काढता येताे हे राॅबिन ए. पुखराम या शिक्षकाने दाखवून दिले आहे.चुरचंदापूर येथील सेंट स्टिफन्स इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक असलेल्या पुखराम यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन पालक-शिक्षक बैठकींसाठी दाट जंगल आणि डाेंगराळ भागातून तब्बल 120 किलाेमीटरचा प्रवास केला. त्यांचे अनेक विद्यार्थी या दुर्गम भागातील गावांमध्ये राहतात आणि चुरचंदापूरला येण्यासाठी त्यांना महागड्या खासगी वाहनाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यांची असाहयता ओळखून पुखराम आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनीच विद्यार्थ्यांच्या गावांमध्ये जाऊन बैठका घेणे सुरू केले आहे.
आतापर्यंत त्यांनी 25 गावांमध्ये अशा बैठका घेतल्या आहेत. एवढ्यावरच पुखराम थांबलेले नाहीत. 2016मध्ये मुख्याध्यापकपदाची सूत्रे स्वीकारल्यावर त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी अल्पदरात राहण्याची व्यवस्था असलेले वसतिगृह सुरू केले. त्यामुळे 2015मध्ये केवळ पन्नास विद्यार्थी असलेल्या या शाळेत आता 545पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.काेराेना महामारीमुळे सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. पण त्यासाठी आवश्यक असलेली स्मार्टफाेन, टॅब्लेट किंवा लॅपटाॅप ही उपकरणे महाग असल्यामुळे गरीब मुलांनी शिक्षणापासून वंचित राहावयाचे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पण केरळच्या काेझिकाेड येथील निवृत्त विज्ञान शिक्षक पी. के. विनाेद कुमार यांनी त्यांच्या कृतीतून या प्रश्नाला उत्तर दिले आहे.गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा लाभ घेता यावा म्हणून विनाेद कुमार यांनी त्यांच्या निवृत्तिवेतनातील रकमेतून 18 डिजिटल टॅब्लेट विकत घेऊन ते विद्यार्थ्यांना दिले. साधन मिळाल्यामुळे मुलांचे शिक्षण सुरू राहिले आहे. अशी मदत करणे विनाेद कुमार यांच्यासाठी नवे नाही.काेदल येथे शिक्षक असताना त्यांनी गरीब कुटुंबांतील मुलांना अन्नधान्य आणि शालेय अभ्यासाचे साहित्य पुरविले हाेते. वर्षभराच्या काळात शाळेत सर्वाेत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्याला ते पारिताेषिकही देत असत. ‘एका मध्यमवर्गीय कुटुंबातून मी आलाे आहे.माझ्या प्रगतीत अनेकांची मदत मला झाली. आता मदत करण्याची माझी वेळ आहे,’ असे विनाेद कुमार म्हणतात.लेहमधील लामडाेन माॅडेल सिनियर सेकंडरी स्कूलमधील गणिताचे शिक्षक किफायत हुसेन या शिक्षकांचे काम प्रेरणादायी आहे. हुसेन यांचे गाव ‘काेव्हिड-19’च्या कंटेन्मेंट झाेनमध्ये आल्यावर आपल्यामुळे विद्यार्थ्यांना संसर्ग हाेण्याची भीती त्यांना वाटायला लागली. त्यामुळे त्यांनी करून घेतलेल्या चाचणीत ते पाॅझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आणि लेहमधील महाबाेधी हाॅस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले गेले.पण आपल्या अनुपस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ नये म्हणून हुसेन यांनी इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून ऑनलाइन क्लासेस सुरू केले. शिवाय त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरून प्रिरेकाॅर्डेड व्हिडिओसुद्धा अपलाेड केले. रुग्णालयातील कर्मचारी आणि लेह प्रशासनाच्या मदतीमुळे हुसेन यांनी ‘झूम’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राेज एक तास शिकविले. ‘शिकविणे मला फार आवडते. ताेच माझा जीवनाचा हेतू आहे. केवळ विषाणूमुळे मी थांबणार नाही,’ असे हुसेन यांनी सांगितले.