मित्र मैत्रिणींनाे तुम्हाला खनिजे माहिती असतील. ही खनिजे, धातू माणसाच्या प्रगतीसाठी कारणीभूत ठरली आहेत. अश्मयुगाच्या अगदी सुरुवातीस खनिजापासून तयार केलेल्या वस्तू माणसे वापरीत असत म्हणजे त्यापूर्वी खाणकामास सुरुवात झाली असावी असा अंदाज आहे. मानवास उपयाेगी असणारी बहुतेक सर्व खनिजे, खडक व धातुके पृथ्वीच्या अगदी वरच्या भागात म्हणजे भूकवचाच्या खडकांत सापडतात. हे पदार्थ जेव्हा एखाद्या ठिकाणी माेठ्या प्रमाणात एकत्रित स्वरूपात आढळतात, तेव्हा त्यांना त्या पदार्थाचे साठे असे म्हणतात.हे साठे घट्ट व कठीण अशा खडकांत असतात. असे साठे ज्या ठिकाणी फाेडून मूळच्या खडकापासून खणून काढले जातात, त्यास खाण असे म्हणतात. पूर्वी जमिनीपासून ते साठे असणाऱ्या जागी जाणाऱ्या विहिरीसारख्या भाेकालाच खाण असे म्हणत. परंतु हल्ली ‘खाण’ या शब्दामध्ये ज्या ठिकाणी जमिनीतून खनिज फाेडून काढतात ताे भाग आणि त्याच्या वरच्या बाजूस किंवा जवळच आसपास असणारा गाेदामांचा, फाेडलेल्या साठयापासून उपयुक्त खनिजे बाहेर काढण्याच्या कारखान्याला खाण असे म्हणाले जाते.