भारतात राजस्थानात उंट अधिक आहेत. हे सगळे पाळीव असून, काही लाेक त्यांचा व्यापार करतात. देशाच्या इतर भागांत राजस्थानातून उंट पाठवले जातात. माेठे ओझे घेऊन रखरखीत वाळवंटातून दूरचा प्रवास करण्यासाठी ते उपयाेगी पडतात. भारतीय सैन्यात उंटांचा वापर करतात. कमी वेळात दूरवर संदेश पाेहाेचविण्यास सांडण्या उपयाेगी ठरतात. रेताड प्रदेशातील लाेक त्यांचे दूध व मांस खातात. उंटांच्या केसांपासून कुंचले, गालिचे, घाेंगड्या; तर चामडीपासून पादत्राणे आणि शाेभेच्या वस्तू तयार करतात.
उंटीणीच्या दुधात कॅराेटीनचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते रंगाने पिवळे, परंतु खूप पाैष्टिक असते. उंट साधारणपणे 50-60 वर्षे जगताे. उंटाची मान लांब असल्यामुळे ताेंड उंच करून झाडाचा पाला ते सहज खाऊ शकतात. वाळवंटात पिण्यासाठी पाणी मिळाले नाही तरी वाळवंटातील वनस्पतींपासून मिळालेले पाणी उंटाला पुरेसे हाेते. त्याच्या वजनाच्या 20-25 % पाणी कमी झाले तरी ताे जिवंत राहू शकताे. त्याच्या शरीरांतर्गत रचनेमुळे रक्तातील पाण्याची पातळी कायम राखली जाते. याच रचनेमुळे उंट एकावेळी खूप पाणी पिताे. हे पाणी त्याच्या जठरात असलेल्या पाेकळ्यांमध्ये साठविले जाते.जरूर पडते तेव्हा हे पाणी हळूहळू झिरपून पाेटात येते. लांब पापण्या, कानात असलेले केस व फटीसारख्या नाकपुड्या यामुळे वाळवंटात उष्ण वाळू आणि वारा यांपासून उंटाचे संरक्षण हाेते.