स्पर्श हाेता तुझा, विसरलाे भान मी...

    17-Oct-2020
Total Views |
मानवी स्पर्श आणि त्यामुळे मिळणारा आनंद आपण सध्या गमावून बसलाे आहाेत. काेराेनाने केलेले हे सर्वांत माेठे नुकसान म्हणावे लागेल. स्पर्शाबद्दल सध्या भयाची भावना निर्माण झालेली दिसते. पूर्वी माेकळेपणाने हाेणारे स्पर्श आता नकाेसे वाटू लागले आहेत. त्याबद्दल शंका मनात येत आहेत. स्पर्शाबराेबरच आपण जगण्यापासूनही दूर जात आहाेत.
 
 
df_1  H x W: 0
 
संध्यानंद.काॅम
युराेप-अमेरिकेत लाेक हस्तांदाेलन करणे विसरले आहेत.भारतासह आशियाई देशांमधील नागरिक गळाभेट विसरले आहेत.
अनेकांनी मार्च महिन्यांपूर्वी मित्राला वा मैत्रिणीला कडकडून मिठी मारण्याचा अनुभव घेतला. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांत त्यांना हा अनुभव आणि त्यामुळे मिळणारा आनंद घेता आलेला नाही.वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील हरवलेला स्पर्श हे सध्या जाणवत असलेल्या अस्वस्थतेचे एक प्रमुख कारण नक्कीच आहे.काेराेनासंबंधी ज्या उपाययाेजना करण्यात आल्या, त्या स्पर्शाला मारक ठरल्या आहेत. मग, त्या साेशल डिस्टन्सिंगच्या असाेत वा क्वारंटाइनच्या असाेत. काेराेनाचा कहर असताना, तर स्वतःच्या ताेंडालाही वारंवार हात लावू नका, अशा सूचना दिल्या जात हाेत्या. स्पर्श आणि त्यामुळे मिळणारा आनंद आपल्याला पुन्हा केव्हा लाभणार हा आपल्यापुढचा सध्याचा सर्वांत माेठा प्रश्न आहे. स्पर्श ही मूलभूत मानवी भावना आहे.ती माणसाची गरज आणि शक्तीही आहे. काेणत्याही बाळाची पहिली संवेदना ही स्पर्शाचीच असते. पुरुष वा स्त्री काेणत्याही वयाेगटातील असू दे, ताे वा ती कायम स्पर्शाची भुकेली असते. ताे व्यक्तीला मिळाला नाही, तर त्याचे आयुष्य कंटाळवाणे हाेते. त्याचा जगण्यातला आनंद हरवताे. हातात हात धरणे असू दे वा गळाभेट, मिठी असू दे, त्यामुळे सुरक्षिततेची भावना निर्माण हाेते. स्पर्शामुळे शरीरात जैवरासायनिक (बायाेकेमिकल) बदल हाेतात. ते मेंदूसह शरीराच्या प्रत्येक भागात लहरींद्वारे जाणवतात.मियामी विद्यापीठातील टच रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संचालक टीफनी फिल्ड या गेली तीस वर्षे स्पर्श या विषयाचा अभ्यास करत आहेत.मसाजाचे शरीरावर हाेणारे परिणाम हा त्यांचा खास आवडीचा टाॅपिक. त्यांच्या म्हणण्यानुसार शरीरावर म्हणजेच त्वचेवर काेणत्याही प्रकाराने दाब दिल्यास विद्युतलहरी शरीरभर पसरतात. त्या मेंदूपर्यंतही तत्काळ जातात. स्पर्शाचे परिणाम श्वासाेच्छ्श्वास, रक्तदाब आणि हृदयाच्या ठाेक्यांवरही हाेत असतात.हे परिणाम सकारात्मक असल्यास ते व्यक्तीला निराेगी ठेवतात. चांगल्या आराेग्यासाठी चांगले स्पर्शही आवश्यक असतात. हे स्पर्श आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीण, पती-पत्नी यांचे असू शकतात.काेराेनाच्या साथीमुळे माणसांचा ‘टच’ हरवला आहे. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे, मानवी व्यवहारांमध्ये हा ‘टच’ पुन्हा अनुभवता आला पाहिजे, असे िफल्ड यांना वाटते. स्पर्शामुळे मेंदूत डाेपामाइन आणि ऑक्टिटाॅसिन हे स्राव पाझरतात. या दाेन्ही स्रावांमुळे आपल्या मनात सुखद भावना निर्माण हाेतात.आव्हानात्मक कामगिरीवर जाण्यापूर्वी पतीला पत्नीने मिठी मारून निराेप दिला, तर त्याच्यावरील तणाव एकदम कमी हाेताे, असे अनेक अभ्यासांमधून स्पष्ट झाले आहे.काेराेना साथीपूर्वी डाॅक्टर पेशंटचा हात हातात घेऊन त्याला तपासत असत.त्याच्या नाडीचे ठाेके माेजत असत. पेशंट बरा झाल्यावर त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला, तू आता ठणठणीत आहेस, असे सांगत असत. सध्या हे चित्र बदलले आहे.