महापालिकेच्या सर्वसाधारण सभाच हाेत नसल्याने महत्त्वाचे निर्णय प्रलंबित

    17-Oct-2020
Total Views |
ऑनलाइन कामकाजाबाबत आत्मविश्वासाची कमतरता
 
 
 
फ़५६'_1  H x W:
 
पुणे, 16 ऑक्टोबर (आज का आनंद न्यूज नेटवर्क, पुणे) : काेराेनामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभाच हाेत नसल्याने नागरिक तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय प्रलंबित आहेत.राज्य शासनाने ऑनलाइन सभा घेण्याची परवानगी दिल्यानंतरही बहुमतात असलेल्या भाजपकडून सभा घेण्याबाबत आत्मविश्वास निर्माण हाेत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. किमान या महिन्यात तरी सर्वसाधारण सभा हाेणार का? असा प्रश्न आता नगरसेवकही उपस्थित करू लागले आहेत.महापालिकेचे धाेरणात्मक निर्णय तसेच विविध विकासाच्या प्रकल्पांचे निर्णय सर्वसाधारण सभेमध्ये हाेतात.शहरात मार्चमध्ये काेराेनाचा शिरकाव झाल्यानंतर अद्याप एकाही सर्वसाधारण सभेचे कामकाज न करताच त्या तहकूब करण्यात आल्या आहेत. विशेष असे, की मे महिन्यातच राज्य शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना फिजिकल डिस्टन्सिंग पाळून ऑनलाइन सभा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थायी समिती व अन्य विषय समित्यांच्या सभाही हाेत आहेत.या समित्यांमध्ये मंजूर झालेले बहुतांश धाेरणात्मक निर्णय तसेच प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या अंतिम मान्यतेशिवाय कार्यन्वित हाेत नाहीत. त्यामुळे विषय समित्यांनी विषय मंजूर करूनही त्याचा थेट लाभ जनतेला हाेताना दिसत नाही.सदस्यांच्या प्रभागांच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेपुढे आहेत. तसेच काेराेनाशी लढताना मरण पावलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसेच अनुकंपा तत्त्वावरील नाेकरीचा प्रस्तावही सर्वसाधारण सभेपुढे आहे.मात्र, सभाच हाेत नसल्याने या प्रस्तावांवर कार्यवाही रखडलेली आहे.मध्यंतरी आयाेजित केलेल्या सभांच्या सुरुवातीलाच विराेधी पक्षाच्या सदस्यांनी काेराेनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रभागातील आराेग्य विभागाच्या त्रुटी, खाजगी रुग्णालयांकडून हाेणारी बिलांची आकारणी अशा अनेक गंभीर मुद्यांवर चर्चे ची मागणी केली. परंतु काेराेनाच्या वाढत्या रुग्णसंख्येनुसार फिजिकल डिस्टन्सिंगच्या कारणास्तव महापाैर मुरलीधर माेहाेळ यांनी विराेधकांचा विराेध बाजूला ठेवत सभा तहकूब केल्या. एवढेच नव्हे, तर राज्य शासनाला पत्र पाठवून सभागृहात सभा घेण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी केली. विराेधकांनी यासाठी पाठपुरावा करावा, असे आवाहन करत चेंडू त्यांच्याच काेर्टात ढकलला हाेता.