कॅलिफाेर्निया, 16 ऑक्टोबर (वि.प्र.) : स्त्री-पुरुषांचा पाेशाख वेगळा असताे. पाेशाखाचा रंगही वेगळा असताे. कारण सर्वांना एकच रंग आवडेल, असे नाही. पण अमेरिकेच्या कॅलिफाेर्निया राज्यातील प्लुमस लेक येथील रहिवासी फ्रान्सिस आणि राेजबेरी हे जाेडपे गेल्या 70 वर्षांपासून मॅचिंग ड्रेस वापरतात.हायस्कूलमध्ये शिकत असताना, उभयतांची ओळख झाली. त्यांनी डेटिंग केले, तेव्हापासून हे जाेडपे मॅचिंग ड्रेस घालत आहे. वयाच्या 19 व्या वर्षी राेजमेरीने फ्रान्सिस साेबत विवाह केला. फ्रान्सिसला आपल्याला काेणते कपडे शाेभून दिसतील हे कळत नाही, तर राेजमेरी या बाबतीत हुशार आहे.अमेरिकेत हे जाेडपे ‘सिंगिंग चॅपलिन्स’ म्हणून ओळखले जाते. हे जाेडपे फावल्या वेळात स्थानिक हाॅस्पिटल्स, चर्च आणि आसपासच्या भागात जाऊन रुग्णांची आणि गरजूंची सेवा करतात.