ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांचे वक्तव्य : दाेषी अधिकाऱ्यांवर करणार कारवाई
मुंबई, 15 ऑक्टाेबर (आ.प्र.) : मुंबई व ठाण्यात साेमवारी वीजपुरवठा हाेण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकाराची उच्चस्तरीय चाैकशी करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी दिली.कळवा, पडघे 400 केव्ही वीजवहिनीत 12 ऑक्टाेबरला अचानक तांत्रिक बिघाड हाेऊन वीजपुरवठा खंडित हाेऊन मुंबई व आजूबाजूच्या उपनगरांत वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामाेरे जावे लागले. याची संपूर्ण चाैकशी करण्यात येणार असून, दाेषी अधिकाऱ्यांवर कठाेर कारवाई करणार असल्याचे डाॅ.राऊत यांनी स्पष्ट केले.मुंबई शहर अंधारात जाणे ही साधीसुधी घटना नाही. यापूर्वी 2011 मध्ये अशा प्रकारे वीजपुरवठा खंडित झाला हाेता.त्यावर चाैकशी समिती नेमण्यात आली हाेती. त्या समितीने आपला अहवाल सादर करून भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी काही उपाययाेजना सूचवल्या हाेत्या. त्यावर अंमलबजावणी झाली किंवा नाही हे तपासून बघण्यात येणार आहे. यासाठी कृती अहवाल (एटीआर) मागवला आहे, अशी माहिती डाॅ. राऊत यांनी दिली.या घटनेची चाैकशी करताना सर्व तांत्रिक बाबी तपासून घेण्यात येणार असून, वीज सुरक्षा साधनांचे व उपाययाेजनांचे ऑडिट करण्यात येणार आहे. लवकरच यावर अहवाल सादर करण्यात येणार आहे. काहीजण ऊर्जा खात्याला बदनाम करायचं काम करत आहेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. या घटनेबाबत केंद्रानेही एक समिती नेमली आहे. ही समिती सध्या मुंबईच्या भेटीवर असून, वीजपुरवठा ठप्प हाेण्यामागील कारणांचा शाेध घेत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.