नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग 2022 पर्यंत हाेणार खुला

    14-Oct-2020
Total Views |
राधेश्याम माेपलवार यांची माहिती : नागपूर-शिर्डी मार्गावर पुढील वर्षी मेपासून वाहतूक
 
grt65_1  H x W:
 
नागपूर, 13 ऑक्टाेबर (वि.प्र.) : नागपूर ते मुंबई 701 कि.मी.चे अंतर आठ तासांत पार करता येणारा बहुचर्चित असा समृद्धी महामार्ग 1 मे 2022 पर्यंत वाहतुकीस खुला हाेईल, असे राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नुकतेच जाहीर केले आहे. प्रकल्पातील नागपूर ते शिर्डी हा 520 कि.मी.चा टप्पा 1 मे 2021 पर्यंत पूर्ण केला जाईल.लाॅकडाऊनमुळे या कामास पाच महिन्यांचा विलंब हाेत आहे.काेराेना व लाॅकडाऊनचा राज्यातील पायाभूत सुविधांच्या कामांना फटका बसला आहे. समृद्धी महामार्गाच्या कामासही याचा फटका बसला.काेराेनापूर्व काळात नागपूर ते सिन्नर हा टप्पा डिसेंबर 2020 च्या अखेरीस कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट हाेते. मात्र, त्यास आता पाच महिन्यांचा विलंब हाेत आहे. लाॅकडाऊनपूर्वी संपूर्ण प्रकल्पावर 18 हजारांपेक्षा अधिक कुशल-अकुशल कामगार आणि इतर कर्मचारी कार्यरत हाेते. लाॅकडाऊनमध्ये ही संख्या 10 हजार इतकी कमी झाली. मात्र, आता 20 हजारांवर कर्मचारी कार्यरत असून, महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा 520 कि.मी.चा टप्पा 1 मे 2021 राेजी सुरू हाेईल, असे एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम माेपलवार यांनी सांगितले शिर्डी ते इगतपुरीपर्यंतचे कामही त्यानंतरच्या सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असून, नागपूर ते इगतपुरी हा 563 कि.मी.चा टप्पा 1 डिसेंबर 2021 राेजी कार्यरत हाेईल, असे माेपलवार यांनी सांगितले. इगतपुरी ते मुंबई या टप्प्यातील काम डाेंगराळ भागातून असल्याने ते काम पूर्ण करण्यास थाेडा अधिक कालावधी लागेल.त्यामुळे नागपूर ते मुंबई हा संपूर्ण 701 कि.मी.चा संपूर्ण टप्पा 1 मे 2022 राेजी वाहतुकीस खुला हाेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.समृद्धी महामार्गाच्या निधीसाठी नेपियन सी राेड, वांद्रे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि पुणे-काेल्हापूर मार्गाजवळील एमएसआरडीसीच्या ताब्यातील काही जमिनी दीर्घ मुदतीच्या भाडेकरारावर देण्याचा प्रस्ताव आहे. या माध्यमातून सुमारे 15 हजार काेटी रुपये उभारले जातील. यासंदर्भातील प्रस्ताव, निविदा तयार आहेत. मात्र, सध्या बाजारात उतरू नये, असे सल्लागारांनी सांगितल्यामुळे याबाबत पुढील कार्यवाही केली नसल्याचे माेपलवार यांनी सांगितले.