मुंबई, 12 ऑक्टाेबर (आ.प्र.) : पर्यावरणाचा ऱ्हास करून हाेणारी प्रगती मान्य नसल्याने आरेतील मेट्राे कारशेड कांजूरमार्गमधील सरकारी जमिनीवर करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची घाेषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.शासनाचा एकही पैसा या जमीनखरेदीसाठी खर्च झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले, तसेच आरे वाचवा माेहिमेत ज्या पर्यावरणवाद्यांनी सहभागी हाेऊन आंदाेलन केले, त्या सर्व आंदाेलकांवरील गुन्हे शासन मागे घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. मेट्राे-3 आणि 6 क्रमांकाच्या लाइनचे एकत्रिकरण करण्यात आल्याने नागरिकांचा एकही पैसा वाया जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. आरेतील 800 एकर जागा शासनाने जंगल म्हणून राखीव करण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे असणाऱ्या आदिवासी पाड्यांतील नागरिकांच्या आणि तबेलांच्या अस्तित्वाला धाेका न लावता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेले हे वन शासनाने राखीव जंगल म्हणून घाेषित करण्याचा निर्णय घेतला आहे. आरेत मेट्राे कारशेडसाठी उभारण्यात आलेली इमारत इतर कारणांसाठी वापरता येईल. त्यामुळे त्यासाठी खर्च झालेला निधी वाया जाणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.