मुंबई, 7 सप्टेंबर (आ.प्र.) :
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करून शिक्षण प्रक्रिया अधिक आनंददायी, सुलभ व कृतिप्रधान करण्यासाठी केंद्राच्या स्कूल बॅग पाॅलिसी-2020 ची सर्व शाळांत प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन त्यांच्या शारीरिक वजनाच्या साधारणतः 10 ट्न्नयांपेक्षा जास्त हाेणार नाही, याची काटेकाेर दक्षता शाळांनी घ्यावी, असे शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गाेसावी यांनी परिपत्रकाद्वारे कळवले आहे.
जास्त वजनाच्या दप्तरामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीचा कणा, खांदे व शारीरिक वाढीवर हाेणारे परिणाम टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या धाेरणानुसार पूर्वप्राथमिक वर्गातील बालकांना शक्यताे शाळेत दप्तर आणण्याची आवश्यकता भासणार नाही, या दृष्टीने शाळांनी नियाेजन करावे. मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना राेज अनावश्यक पाठ्यपुस्तके, वह्या किंवा इतर शैक्षणिक साहित्य आणण्यास सांगू नये; तसेच त्या दिवसासाठी आवश्यक असलेलीच पुस्तके आणली जावीत यासाठी वर्गनिहाय दप्तर वेळापत्रक तयार करावे. विद्यार्थ्यांना राेज सर्व पुस्तके घरी नेण्याची आवश्यकता भासू नये म्हणून शाळांनी वर्गखाेल्यांमध्ये कपाटे किंवा लाॅकरची सुरक्षित व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. घरातून जड पाण्याची बाटली आणावी लागू नये यासाठी शाळांनी स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात 10 दिवसांचा दप्तरविरहित कालावधी आयाेजिण्यात यावा. शाळांनी विद्यार्थ्यांच्या व दप्तराच्या वजनाची नियमित तपासणी करून त्याची नाेंदवहीत नाेंद ठेवावी आणि वजन निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यास तत्काळ सुधारणा करावी. दप्तरात अनावश्यक वस्तू न ठेवण्याबाबत पालकसभांमधून पालकांना मार्गदर्शन करावे.
या धाेरणाच्या अंमलबजावणीची प्राथमिक जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची असेल. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना अचानक भेट देऊन दप्तराचे वजन, दप्तर वेळापत्रक व पिण्याच्या पाण्याची तपासणी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करावा, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.