मुंबई, 7 सप्टेंबर (आ.प्र.) :
ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह भुयारी मार्गाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला. या प्रकल्पातील दक्षिण बाेगद्याचे भुयारीकरण मध्य आणि हार्बर रेल्वेच्या सात मार्गांखालून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अवघ्या पाच दिवसांत पूर्ण केले. सुमारे 23 मीटर खाेलीवरून 54 मीटर लांब बाेगदा खाेदण्यात आला असून, रेल्वे वाहतुकीला काेणताही अडथळा न आणता हे काम करण्यात आले.
या आव्हानात्मक कामासाठी एमएमआरडीएने माती आणि खडकांच्या थरांची माहिती घेऊन भूपृष्ठीय लहरींचे विश्लेषण करण्यात आले हाेते. भूपृष्ठ भेदक रडारच्या मदतीने जमिनीखालील वस्तू आणि भूगर्भातील बदल शाेधण्यात आले. संख्यात्मक प्रतिकृती आणि संरचनात्मक अभ्यास करण्यात आला. बाेगदा खाेदताना रेल्वे रुळांवर आणि कर्नाक राेड उड्डाणपुलावर लक्ष ठेवण्यात आले हाेते.
सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या हाेत्या.
ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गाची एकूण लांबी 10 किमी आहे. त्यापैकी सुमारे 7 किमीचा मार्ग भुयारी आहे. बाेगद्याची खाेली 12 ते 52 मीटरपर्यंत आहे.
प्रकल्पाची रचना ताशी 80 किमी वेगासाठी करण्यात आली आहे. या भुयारी मार्गाचे आतापर्यंत सुमारे 15 ट्नके काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियाेजन आहे.
प्रकल्पातील बाेगद्याच्या भुयारीकरणासाठी 12.2 मीटर व्यासाचे टीबीएम वापरण्यात येत आहे. त्याची लांबी 82 मीटर असून, वजन सुमारे 2,400 टन आहे. मऊ जमीन आणि जमिनीत माेठ्या प्रमाणावर पाणी झिरपण्याच्या परिस्थितीत काम करण्यासाठी या यंत्राची रचना करण्यात आली आहे. ग्रँट राेड-चर्नी राेडदरम्यान सात रेल्वे मार्गांखालून बाेगदा नेल्यानंतर आता पुढील टप्प्यात पश्चिम रेल्वेच्या मार्गाखालून बाेगदा नेण्यात येणार आहे. हा बाेगदा सुमारे 24 मीटर खाेलीवरून जाणार आहे. ग्रँट राेड आणि चर्नी राेड स्थानकांदरम्यान सुमारे 120 मीटरचा रेल्वे मार्गाचा भाग त्याखाली येणार आहे.