नवी दिल्ली, 6 सप्टेंबर (आ.प्र.) :
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण अध्यापन, संशाेधन आणि काैशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील नऊ गुणवंत शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार2026 ने गाैरव करण्यात आला.
शिक्षक दिनानिमित्त विज्ञान भवनात झालेल्या साेहळ्यात राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. देशभरातील 48 शालेय शिक्षक, उच्चशिक्षण क्षेत्रातील 21 प्राध्यापक आणि काैशल्य विकास क्षेत्रातील 13 शिक्षक अशा एकूण 82 शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. प्रमाणपत्र, पदक आणि 50 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप हाेते.
यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जाेशी, राज्यमंत्री डाॅ. सुकांत मजुमदार, काैशल्य विकास व उद्याेजकता राज्यमंत्री जयंत चाैधरी, शिक्षण मंत्रालयाचे सचिव अनिल कुमार, काैशल्य विकास व उद्याेजकता मंत्रालयाच्या सचिव देबाश्री मुखर्जी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित हाेते. डाॅ. कविता नृसिंहराव गिट्टे, कुंदा जयवंत बच्छाव, वैभव वसंतराव कुलकर्णी, शिवप्रसाद अरविंद टिंगरे, डाॅ. विक्रम विशाल, डाॅ. अमर माेहनराव ताकसांडे, डाॅ. संदीपान प्रल्हाद नराेटे, किरण प्रकाश झारकर व अर्चना राकेश जाधव या शिक्षकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.