मुंबई, 6 सप्टेंबर (आ.प्र.) :
भारत आणि बेल्जियममधील शतकाहून अधिक काळाची हिरे व्यापारातील भागीदारी परस्पर विश्वास, पारदर्शकता आणि सहकार्यावर आधारित असून, हे नाते कधीही न तुटणारे आहे, असे प्रतिपादन बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांनी केले.
राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुलातील भारत डायमंड बाेर्समध्ये आयाेजित हिरे व्यापार क्षेत्रातील उद्याेजकांच्या संवाद कार्यक्रमात वेव्हर बाेलत हाेते. यावेळी बाेर्सचे अध्यक्ष अनुप मेहता, जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पाेर्ट प्रमाेशन काैन्सिलचे अध्यक्ष किरीट भन्साली, बेल्जियमचे राजदूत डिडिएर व्हँडरहासेल्ट, महावाणिज्यदूत फ्रँक गीर्केन्स, भारताचे बेल्जियममधील राजदूत प्रणय वर्मा, बाेर्सचे पदाधिकारी आणि हिरे उद्याेग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित हाेते.
अँटवर्पने भारतीय हिरे उद्याेगाच्या जागतिक विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे अनुप मेहता यांनी सांगितले. भारत डायमंड बाेर्स हे जगातील सर्वांंत माेठे हिरे व्यापार केंद्र असून, सुमारे 2500 कार्यालये आणि राेज 45 हजारांहून अधिक व्यावसायिक येथे व्यवहार करतात, अशी माहिती त्यांनी दिली; तसेच भारताच्या किम्बर्ली प्राेसेस अध्यक्षपदाच्या काळात बेल्जियमकडून सकारात्मक सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्य्नत केली.
भारत डायमंड बाेर्सला भेट देणारे बार्ट डी. वेव्हर हे भारताबाहेरील पहिले पंतप्रधान असल्याचे सांगून या भेटीला ऐतिहासिक महत्त्व असल्याचे भन्साली यांनी नमूद केले. भारत- बेल्जियम हिरे व्यापार संबंध अधिक बळकट करण्यासाठी सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली. दाेन्ही देशांतील उद्याेग, व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात आगामी काळात नव्या संधी निर्माण हाेतील, असा विश्वासही व्य्नत करण्यात आला.