सद्विद्यावान मनुष्य उत्तम वक्ता असताे व आपल्या वाक्पटूत्वाने ताे श्राेत्यांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन करून आपले म्हणणे त्यांना पटवून देऊ शकताे. स्वत: सर्व जाणत असूनही जेव्हा ताे श्राेता म्हणून बसताे तेव्हा स्वत:चे शहाणपण प्रगट न करता व्नत्याचे भाषण एकाग्रतेने ऐकत असताे.
आजकाल आपण अनेकदा वक्ता बाेलत असताना मध्येमध्ये त्याला अडवून स्वत:च्या माेठेपणाचे प्रदर्शन करणारे श्राेते पाहताे. काही वेळा तर व्यासपीठावर बसलेली मान्यवर मंडळीही हा प्रमाद करीत असतात.
अशांनी हा उपदेश लक्षात घ्यावयास हवा. असा मनुष्य चतुराईने आणि वितंडवाद टाळून आपले म्हणणे इतरांचे गळी उतरवू शकताे. ताे स्वत: विमल ब्रह्माचे ज्ञान प्राप्त करूनही आणि सिद्धपुरुष झाल्यावरही आपले ज्ञानार्जन आणि साधना साेडत नाही. असा मनुष्य अनेक गुणांची साक्षात मूर्ती बनून जाताे. त्याच्या केवळ दर्शनाने साधकांच्या मनात ते ते भाव व गुण जागृत हाेऊन समाधान प्राप्त हाेते.
सुख, संताेष, आनंद, हास्य, ऐ्नय, आत्मा या गुणांचे ताे जणू प्रतिकच बनताे आणि सर्वांना त्या गुणाचा त्याच्या ठायी प्रत्यय येताे.
या सर्वच समासांत श्रीसमर्थांचे भाषाप्रभुत्व आणि अलाैकिक शब्दकळा आपल्याला ठायी ठायी प्रत्ययास येते. ते म्हणतात, असा पुरुष भाग्यवंत, जयवंत, रूपवंत, गुणवान, आचारशील, विचारशील आणि क्रियाशील असताे.