महाराष्ट्र ऊर्जा विभाग दालनाला नावीन्यपूर्ण स्टॉलचा पुरस्कार

दिल्ली येथील जागतिक परिषदेच्या प्रदर्शनात मोठा प्रतिसाद

    04-Sep-2026
Total Views |

maharashtra 
नवी दिल्ली, 3 सप्टेंबर (आ. प्र.) :
येथील भारत इलेक्ट्रिसिटी, पाॅवरजेन इंडिया आणि इंडियन युटिलिटी वीक या जागतिक परिषदेच्या ऊर्जा प्रदर्शनात महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाच्या दालनाला सर्वाेत्कृष्ट नावीन्यपूर्ण स्टाॅल डिझाइनच्या पुरस्काराने गाैरवण्यात आले. केंद्रीय विद्युत आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
या परिषदेत महाराष्ट्र फाेकस स्टेट म्हणून सहभागी झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आणि ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्या नेतृत्वात राज्याने ऊर्जा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे सादरीकरण या परिषदेतील लक्षवेधक प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यास माेठा प्रतिसाद मिळत आहे.
 
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लाेकेश चंद्र, महाऊर्जाचे महासंचालक ओमप्रकाश बकाेरिया, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी., महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विक्रम कुमार यांच्या मार्गदर्शनात चारही संस्थांचे संयु्नत दालन या परिषदेत उभारण्यात आले आहे. या दालनाचे प्रमुख आकर्षण असलेल्या इंटरअ‍ॅक्टिव्ह टच वाॅलला माेठा प्रतिसाद मिळाला. महावितरण, महानिर्मिती, महापारेषण आणि महाऊर्जाच्या प्रमुख याेजना, प्रकल्प आणि यशाची माहिती या माध्यमातून देण्यात आली आहे.