मुंबई, 3 सप्टेंबर (आ.प्र.) :
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्राेत्साहन देण्यासाठी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठात आता कुलपती पदक प्रदान करण्यात येणार आहे. राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात येत असलेल्या या उपक्रमासाठी राज्यपालांच्या हस्ते तिन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूंना प्रत्येकी 10 लाखांचा प्रातिनिधिक धनादेश लाेकभवनात प्रदान करण्यात आला.
राज्यपालांच्या हस्ते इन्स्टिट्यूट ऑफ हायर अँड डिजिटल लर्निंग : इंडस्ट्री-अॅकॅडेमिया काेलॅबाेरेशन फाॅर इम्प्रूव्हिंग एम्प्लाॅयेबिलिटी या उपक्रमाचाही प्रारंभ करण्यात आला. कुलपती पदक केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाची, नेतृत्वगुणांची, नवाेन्मेषाची, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीची, सामाजिक बांधिलकीची आणि विद्यापीठासाठीच्या विशेष याेगदानाची दखल घेणारे असावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्य्नत केली आहे. पदकासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी विद्यापीठांनी पारदर्शक आणि गुणवत्ताधिष्ठित निकष निश्चित करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यपालांचे सचिव डाॅ. प्रशांत नारनवरे यांनी कुलपती पदक उपक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ. मनाली क्षीरसागर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गाेसावी यांच्यासह विविध विद्यापीठांचे प्र-कुलगुरू, संचालक, अधिष्ठाता, प्राचार्य, उद्याेग व शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी, प्रसिद्ध माजी विद्यार्थी, क्रीडा पुरस्कार विजेते, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.