छत्रपती संभाजीनगर, 3 सप्टेंबर (आ.प्र.) :
कार्यालयीन परिसर स्वच्छ, सुंदर व आराेग्यदायी ठेवण्यासाेबतच अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये स्वच्छतेची भावना रुजवण्यासाठी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून स्वच्छ कार्यालय निराेगी, सकारात्मक आणि कार्यक्षम वातावरण या माेहिमेला प्रारंभ करण्यात झाला.
विभागीय आयुक्तांनी कार्यालयाच्या परिसरात स्वतः स्वच्छता उपक्रमात सहभागी हाेत माेहिमेची सुरुवात केली. स्वच्छ कार्यालय ही केवळ जबाबदारी नसून, सकारात्मक आणि कार्यक्षम कार्यसंस्कृतीची सुरुवात आहे, असे सांगून श्रीकांत यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या माेहिमेत सक्रिय सहभागाचे आवाहन केले. कार्यालयीन परिसर स्वच्छ व निराेगी ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमांतर्गत दर साेमवारी सकाळी 10 ते 11 या वेळेत एक तास श्रमदान करण्यात येणार आहे. सर्व अधिकारी आपल्या अधिनस्त कर्मचारीवर्गासह या उपक्रमात सहभागी हाेणार असून, कार्यालयीन परिसर, सभाेवतालची जागा, तसेच कामकाजाच्या ठिकाणी स्वच्छता राखण्यावर भर देण्यात येणार आहे. स्वच्छता हीच सेवा या भावनेतून राबवण्यात येणाऱ्या या माेहिमेमुळे कार्यालयीन परिसर अधिक स्वच्छ, सुंदर व प्रसन्न हाेण्यास मदत हाेणार आहे.
कार्यालयीन स्वच्छता व परिसराच्या सुशाेभीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपल्या कार्यस्थळाची स्वच्छता, नीटनेटकेपणा व परिसराची निगा राखण्याची जबाबदारी स्वीकारावी, असा संदेश या माेहिमेतून देण्यात आला.