नागपुरात अतिविशेषोपचार दंतचिकित्सा केंद्र सुरू होणार

मुख्यमंत्र्यांची माहिती : तीन महिन्यांत लोकार्पणाचे निर्देश दिले

    30-Sep-2026
Total Views |

Nagpur 
नागपूर, 29 सप्टेंबर (आ.प्र.) :
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कॅम्पसमधील प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिविशेषाेपचार दंतचिकित्सा व संशाेधन केंद्राचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून पुढील तीन महिन्यांत त्याचे लाेकार्पण करण्याचे निर्देश दिले. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विविध अतिविशेष दंतचिकित्सा सुविधांनी सुसज्ज हाेणाऱ्या या केंद्रामुळे विदर्भासह मध्य भारतातील दंत रुग्णांना माेठा लाभ मिळणार असून, दंत शिक्षण व संशाेधनालाही नवी दिशा मिळणार आहे.
 
वैद्यकीय शिक्षण व संशाेधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय ही संस्था 1968 पासून कार्यरत आहे. विदर्भ आणि मध्य भारतातून माेठ्या संख्येने दंतरुग्ण या संस्थेत उपचारांसाठी येतात. राेज किमान 500 रुग्ण या संस्थेच्या आराेग्यसेवेचा लाभ घेतात. अशा महत्त्वपूर्ण संस्थेत अतिविशेषाेपचार सेवा उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेतून या केंद्राची उभारणी करण्यात येत आहे.
 
या केंद्राच्या इमारतीचे 80 ट्नके काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम प्रगतिपथावर आहे. या केंद्रासाठी शासनाने नवीन पदांना मान्यता दिली असून, काही पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. या केंद्रात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियाेजन समितींतर्गत सुमारे 3 काेटी 89 लाखांच्या यंत्रसामग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता मिळाली तसेच राज्य याेजनेंतर्गत सुमारे 3 काेटी 43 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. यंत्रसामग्री खरेदीची प्रक्रिया सुरू आहे.
 
दंतचिकित्सा व संशाेधन केंद्र अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुरू झाल्यानंतर दंत संशाेधन आणि रुग्णसेवेच्या क्षेत्रात महाराष्ट्राची आघाडी आणखी मजबूत हाेण्यास मदत हाेणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.