ताे तसा झाला की मग साहजिकच आईबापांना त्याचा प्रपंच थाटून देण्याची घाई हाेते. ते मुली पाहू लागतात. मुलीच्या बापांना आपले सगळे वैभव दाखवून आपला मुलगा कसे उत्तम स्थळ आहे, हे पटवून देतात आणि मग एकदाची मुलगी पसंत करून त्याचे लग्न करून देतात. वऱ्हाड्यांनी माेठ्या थाटामाटाने विवाह साेहळा केल्यावर हा तरुण नवराही आनंदित हाेताे व सासुरवाडीचे काैतुकात रंगून जाऊ लागताे. आपली तरुण पत्नी म्हणजे आपण मिळवलेले माेठे वैभव आहे असे त्याला वाटू लागते आणि आपल्यासारखे सुखी व भाग्यवान आपणच, असे ताे मानू लागताे. आईबापांची परिस्थिती कशीही गरिबीची असली तरी आपण सासुरवाडीला जाताना रूबाबात व थाटामाटात जावे अशी ताे इच्छा धरताे आणि वेळप्रसंगी त्यासाठी कर्ज काढण्यासही मागेपुढे पाहात नाही.
मनुष्याच्या जीवनप्रवासाचे श्रीसमर्थांचे निरीक्षण किती सूक्ष्म आहे ते दासबाेधात ठायीठायी प्रगट हाेते.
येथेही आईशिवाय तळमळणारे लहान मूल थाेडे माेठे झाल्यावर मित्रांच्यात रमू लागते आणि लग्न झाल्यावर तर त्याला आईवडिलांपेक्षाही पत्नी व सासूसासरेच कसे थाेर वाटू लागतात; त्याचे सुबाेध वर्णन करीत आहेत. ते म्हणतात की, त्याचा ओढा आता आईवडिलांना विसरून सर्वस्वी सासुरवाडीकडे लागताे.
आईबापांची स्थिती दीन व बापुडवाणी ज्याला श्रीसमर्थ कुडकुडी म्हणतात अशी हाेऊन जाते. ताे आपल्या वर्तणुकीने पण त्यांना दाखवून देताे की, माझ्या आयुष्यातील तुमचे कार्य आता संपले आहे आणि त्यात तुम्हाला आता काहीही स्थान नाही. हे सर्व सांगण्यामागे आपण असे कृतघ्नतेने आईवडिलांशी वागू नये, हेच श्रीसमर्थांना सांगावयाचे आहे।
- प्रा. अरुण गाेडबाेले,
माे. 9822016299