मुंबई, 2 सप्टेंबर (आ.प्र.) :
अमरावतीच्या स्त्री रुग्णालयात लागलेल्या आगीच्या दुर्घटनेची दखल राज्यातील वैद्यकीय संस्थांनी घेतली असून, त्या अनुषंगाने खबरदारीच्या उपाययाेजना करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाने यापुढे व्हेंटिलेटरसारखी उपकरणे खरेदी करण्यासाठी नवीन एसओपी तयार करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करणार आहे.
विभागांतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयातील इलेक्ट्रिकल आणि फायर ऑडिट त्रयस्थ संस्थेतर्फे करण्यात येणार आहे.
राज्यात 35 मेडिकल काॅलेजशी संलग्न रुग्णालये आहेत. तेथे अतितत्काळ विभाग, नवजात शिशू विभाग, स्त्री राेग विभाग आदींसाठी अतिदक्षता विभाग आहेत. तेथे व्हेंटिलेटरचा वापर माेठ्या प्रमाणावर हाेत असताे. वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी सरकारकडून रुग्णालयातील तज्ज्ञांची तांत्रिक समिती नियुक्त करण्यात येते. मात्र, यात चुका राहू नयेत, यासाठी राज्यस्तरावर समिती नेमून अशी उपकरणे खरेदी करताना काेणती काळजी घ्यावी, यासाठी समिती नेमून एसओपी तयार करण्यात येणार आहे. व्हेंटिलेटर खरेदी करताना राज्य वैद्यकीय प्राधिकरणाकडून त्या खरेदी करावयाच्या सूचना सरकारी आराेग्य संस्थांना आहेत. अमरावतीच्या दुर्घटनेनंतर रुग्णालयांना इलेक्ट्रिकल, अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणेचे त्रयस्थ संस्थेतर्फे ऑडिट करून घेण्याच्या सूचना आहेत. व्हेंटिलेटरसारखी उपकरणे खरेदी करण्यासाठी नवीन एसओपी तयार करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करणार आहे, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.