नाशिक, 2 सप्टेंबर (आ.प्र.) :
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लूटमारीच्या घटनांमुळे चर्चेत आला. या महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा या निमित्ताने पुढे आला. वाहनधारकांमध्ये या घटनांची तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने आता पाेलिसांनी समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नाशिक जिल्ह्यात विशेष उपाययाेजना करण्याचे नियाेजन करण्यात आले आहे.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मलढाेण आणि दुशिंगपूर शिवारात गुरुवारी मध्यरात्री दराेडेखाेरांच्या टाेळक्याने वाहनांच्या मार्गात खिळे आणि धारदार लाेखंडी वस्तू टाकून वाहनांचे टायर पंक्चर करुन लुटमार केली. दीड तास हा घटनाक्रम सुरू असतानाही महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेला त्याचा थांगपत्ताही न लागल्याने प्रवाशांमध्ये आश्चर्य व्य्नत करण्यात आले. या घटनांमुळे समृद्धी महामार्गाने जाणाऱ्या प्रवाशांनी आता स्वत:च्या सुरक्षेची काळजी स्वत:च करावी का, असा प्रश्न करण्यात येत आहे
.
समृद्धी महामार्गावर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि वावी हद्दीत एकाच रात्री घडलेल्या या लुटमारीच्या घटनांमुळे जिल्हा पाेलीस सतर्क झाले आहेत. जिल्ह्यात वावी, सिन्नर, घाेटी आणि इगतपुरी या चार ठाण्यांच्या हद्दीत समृद्धी महामार्गाचा 96 किमीचा भाग आहे. महामार्गावर फारशी वर्दळ नसल्याने गुन्हेगारी टाेळ्या या भागात सक्रिय झाल्या आहेत. नाशिक जिल्हा पाेलीस अधीक्षक डाॅ. डी. एस. स्वामी यांनी महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. या घटनांची गंभीर दखल घेत महामार्गावर गस्तीसाठी नवीन पथक तैनात करण्यात आले आहे. प्रवाशांनी भीती न बाळगता निर्धास्त प्रवास करावा. नाशिक जिल्ह्यात या महामार्गावरील प्रवाशांची लूट राेखण्यासाठी आता 6 विशेष वाहने आणि 30 पाेलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे महामार्गावर काेठे काही अघटित घडत असल्यास पथक काही मिनिटांत घटनास्थळी पाेहाेचू शकेल, असे डाॅ. स्वामी यांनी सांगितले.