मुंबई, 2 सप्टेंबर (आ.प्र.) :
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्राे 5 मार्गिकेचा उल्हासनगरपर्यंत विस्तार करण्याचा मार्ग अखेर माेकळा झाला. मेट्राे-5 मार्गिकेच्या विस्तारित टप्पा 2 (धामणकर नाका ते दुर्गाडी), टप्पा-3 (दुर्गाडी ते कल्याण) आणि 5 अ (भाेईरवाडी ते उल्हासनगर) मार्गिकेला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. 28 ऑगस्टला यासंबंधीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. लवकरच एमएमआरडीए या मार्गिकेच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवणार आहे.
या विस्तारित मार्गिकेमुळे ठाणे ते उल्हासनगर प्रवास अतिजलद हाेणार आहे.
एमएमआरडीएने ठाणे-भिवंडी-कल्याण अशा 24.9 किमीच्या आणि 8400 काेटींच्या मेट्राे-5 मार्गिकेचे काम दाेन टप्प्यांत हाती घेतले आहे. त्यानुसार कापूरबावडी ते धामणकर नाका अशा पहिल्या टप्प्याचे काम सुरू असून, आतापर्यंत या टप्प्याचे 98 ट्नके काम पूर्ण झाले आहे. येत्या काही महिन्यांत या टप्प्याचे संचालन करण्याचे नियाेजन एमएमआरडीएचे आहे.
मेट्राे टप्पा-2 चे काम रखडले हाेते. भिवंडी ते कल्याण टप्पा-2 मार्गिकेत माेठ्या प्रमाणात पुनर्वसन समस्या असल्यामुळे पूर्वीच्या मेट्राेमार्गात सुधारणा करून दुर्गाडी ते कल्याण या उन्नत मार्गिकेचे भूमिगत मार्गिकेत रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. काही कारणाने विस्तारित मेट्राे-5 मार्गिकेत राज्य सरकारच्या निर्देशानुसार एमएमआरडीएने पुन्हा सुधारणा केली. त्यानुसार मेट्राे-5 मार्गिकेचा विस्तार टप्पा-2 अंतर्गत धामणकर नाका ते दुर्गाडीपर्यंत, टप्पा-3 अंतर्गत दुर्गाडी ते कल्याणपर्यंत आणि 5 अ अंतर्गत भाेईरवाडी ते उल्हासनगरपर्यंत करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्राकडे मान्यतेसाठी गेला हाेता.
केंद्राने या मार्गिकेस नुकतीच मान्यता दिली असून, यासंबंधीची अधिसूचना 28 ऑगस्टला प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आता मेट्राे- 5 मार्गिका ठाणे ते उल्हासनगर अशी धावणार आहे. टप्पा 2, 3 आणि 5 अ मार्गिकेच्या बांधकामासाठी आता एमएमआरडीएकडून निविदा काढल्या जातील आणि विस्तारित मेट्राे मार्गिकेचे काम मार्गी लागेल. या विस्तारित मार्गिकेमुळे ठाणे, कल्याण आणि उल्हासनगरमधील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.