अलिबाग, 2 सप्टेंबर (आ.प्र.) :
मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यानची फेरीबाेट जलवाहतूक सेवा 1 सप्टेंबरपासून सुरू करण्यास मेरीटाइम बाेर्डाने अनुमती दिली आहे. मुंबईला जाेडणारा हा सर्वांत जवळचा आणि वेळेची बचत करणारा मार्ग असून, वर्षातील तीन महिने ही सेवा बंद असते.
अलिबाग मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया, गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग मांडवा असा प्रवास बाेटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या पंधरा लाखांच्या आसपास आहे. दर अर्ध्यातासाने एक फेरीबाेट मांडवा बंदरातून सुटते. गर्दीच्या वेळेला ही सरासरी वाढवली जाते. स्पीडबाेट, राे-राेपेक्षा फेरीबाेटीचा प्रवास सर्वसामान्यांना परवडणारा आहे.
त्याचबराेबर रस्त्यांवरील खड्डे, प्रदूषण, वाहतूक काेंडीपासून सुटका म्हणून विशेषतः अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील प्रवासी फेरीबाेटीचा वापर करतात. 1 सप्टेंबरपासून ही सेवा पुन्हा सुरू झाल्याने प्रवासी व पर्यटकांना दिलासा मिळाला आहे.