पुणे, 2 सप्टेंबर (आ.प्र.) :
बृहन्महाराष्ट्र काॅलेज ऑफ काॅमर्स (बीएमसीसी) आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या विद्यमाने अथर्वशीर्ष पठण अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, यासाठी बृहन्महाराष्ट्र काॅलेज ऑफ काॅमर्समध्ये सामंजस्य करार करण्यात आला. हा करार तीन वर्षांसाठी असून, या माध्यमातून आध्यात्मिक, सामाजिक आणि साहित्यिक ज्ञानाचा डिजिटल माध्यमातून प्रसार करण्याबराेबरच गाणपत्य तत्त्वज्ञानाचा अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रसार करण्यावर भर देण्यात येणार आहे.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डाॅ. दीपक पाैडेल, उपप्राचार्य प्रा.
डाॅ. भारती उपाध्ये, प्रा. डाॅ. प्रशांत साठे, प्रा. डाॅ. वर्षा देशपांडे, प्रा. डाॅ.
राजेश्री गाेखले; तसेच दगडूशेठ ट्रस्टचे काेषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, विश्वस्त व उत्सवप्रमुख अमाेल केदारी आणि ओंकार कलढाेणकर उपस्थित हाेते.
राष्ट्रीय शैक्षणिक धाेरणांतर्गत भारतीय ज्ञान परंपरेला अनुसरून या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत विविध अल्पकालीन; तसेच ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची निर्मिती व अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे प्रमाणीकरण करण्याची जबाबदारी महाविद्यालयाची राहणार आहे.
दगडूशेठ ट्रस्टच्या माध्यमातून विविध माध्यमांचा वापर करून आध्यात्मिक विचारांमध्ये रुची असलेल्यांना अभ्यासक्रमांशी जाेडण्यात येईल. या उपक्रमासाठी बीएमसीसीकडून लाेकमान्य टिळक महाविद्यालयाचे संस्कृत विभागप्रमुख डाॅ. स्वानंद गजानन पुंड आणि ट्रस्टकडून अध्यक्ष सुनील रासने समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.