नागपूर, 28 सप्टेंबर (आ.प्र.) :
चर्मकार समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक प्रगतीसाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. या अनुषंगाने नागपूरजवळील बाबुळखेडा परिसरात श्री संत रविदास महाराजांचे स्मारक व सभागृहाच्या बांधकामासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देईल; तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता यावा यासाठी अद्ययावत ई-लायब्ररी सुरू करण्यात येईल. श्री संत रविदास महाराजांच्या 650व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून राज्यस्तरीय कार्यक्रमांचे व्यापक आयाेजन केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
(स्व.) श्रीमती भानुताई गडकरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चर्मकार सेवा संघाने आयाेजिलेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात मुख्यमंत्री बाेलत हाेते. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आमदार कृष्णा खाेपडे, राज्य सफाई कामगार आयाेगाचे अध्यक्ष सतीश डागाेर, माजी महापाैर दयाशंकर तिवारी, चर्मकार सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष भैयासाहेब बिघाने यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित हाेते. या साेहळ्यात दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तम यश संपादन करणाऱ्या 495 गुणवंत विद्यार्थ्यांचा मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गाैरव करण्यात आला; तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या चर्मकार समाजातील नागरिकांनाही सन्मानित करण्यात आले. संत राेहिदास चर्माेद्याेग व चर्मकार विकास महामंडळाची नव्याने बांधणी करण्यात येईल. बार्टी आणि आर्टीच्या धर्तीवर लिडकाॅमची नव्याने बांधणी करून चर्मकार समाजातील मुलांसाठी प्रशिक्षण व तत्सम सेवासुविधा देण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
तरुणांनी काैशल्याधारित शिक्षण आत्मसात करावे. चर्माेद्याेग आणि पारंपरिक कलांत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उद्याेगांच्या माध्यमातून नवीन राेजगार निर्माण करण्याची गरज गडकरी यांनी व्य्नत केली.