सांगली, 28 सप्टेंबर (आ. प्र.) :
सांगली येथील कृष्णा नदीच्या काठावरील लाेकनेते वसंतदादा पाटील यांच्या समाधीलगत ‘महापुराशी दाेन हात’ या सांगलीच्या जलसंपदा विभागातील निवृत्त अभियंता कै. विजयकुमार दिवाण आणि अभियंता प्रभाकर केंगार लिखित पुस्तकाचा प्रकाशन साेहळा साेमवारी (21 सप्टेंबर) सायंकाळी भर पावसात पार पडला.
कृष्णा, वारणा, पंचगंगा आणि दूधगंगा या नद्यांच्या काठावरील सांगली, काेल्हापूर व सातारा जिल्ह्यातील फार माेठ्या भागाला गेली काही वर्षे पावसाळ्यात महापुराचा तडाखा बसत आहे. वारंवार येणारे हे महापूर नेमके कशामुळे येतात व ताे राेखण्यासाठी काेणती उपाययाेजना केली पाहिजे, या संदर्भात या पुस्तकात माहिती दिली असून, ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्त्रबुद्धे यांनी या पुस्तकाचे संपादन केले अहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी या पुस्तकास प्रस्तावना लिहिली आहे.
यावेळी जलसंपदा विभागातील निवृत्त अधीक्षक अभियंता शांतिनाथ पाटील, पुस्तकाचे लेखक प्रभाकर केंगार, महापूर नियंत्रण कृती समितीचे अध्यक्ष डाॅ. अभिषेक दिवाण, महापूर नियंत्रण समितीचे समन्वयक सर्जेराव पाटील, चिंतामणी सहस्त्रबुद्धे, माजी महापाैर प्रा. नितीन साबगावे, सुहास पाटील, पुस्तकाचे मुद्रक पत्रकार जगन्नाथ पाटील आणि मारुती नवलाई; तसेच कृष्णामाई जलतरण संस्थेचे गाेपाळ मर्दा, पत्रकार विजय पडियार, प्रा. डाॅ. संजय ठिगळे, आनंदराव काेरे आदी मान्यवर उपस्थित हाेते. शांतिनाथ पाटील, प्रभाकर केंंगार, सर्जे राव पाटील, चिंतामणी सहस्त्रबुद्धे यांनी या पुस्तकाविषयी माहिती दिली.