परभणी, 27 सप्टेंबर (आ.प्र.) :
पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. उभ्या पिकांचे नुकसान हाेत असताना त्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर साेडणार नाही. झालेल्या नुकसानाची याेग्य ती दखल घेऊन सर्वताेपरी मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. श्रीमती पवार यांनी परभणी जिल्ह्यातील मरडसगाव, दैठणा व पाथरी; तसेच बीड जिल्ह्यातील माजलगाव व परिसरात शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी आस्थेने संवाद साधला आणि संकटाच्या या काळात शासन तुमच्या पाठीशी आहे, असा धीरही दिला. मी स्वतः मराठवाड्याची लेक आहे.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी आणि दुष्काळी स्थितीची मला जाणीव आहे. शेतकऱ्यांच्या भावना आणि त्यांच्या अडचणींची शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर मदत मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. चारा आणि पाण्याबाबत शेतकऱ्यांनी काळजी करू नये, असे पवार यांनी स्पष्ट केले. शेतकरी कुटुंबांना पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पिण्याचे पाणी आणि चारा उपलब्ध करून देण्याबाबत शासन कार्यवाही करणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीही आवश्यक ती मदत करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे पवार यांनी सांगितले.