दुष्काळावर मात करण्यास एकजुटीने प्रयत्न करू या : मुख्यमंत्र्यांचा निर्धार

    28-Sep-2026
Total Views |
 
Drought
मुंबई, 27 सप्टेंबर (आ.प्र.) :
दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी मदतीच्या केंद्रस्थानी असून, त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वताेपरी प्रयत्न केले जातील. आम्ही शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहाेत. या आव्हानावर मात करण्यासाठी आपण सर्व एकजुटीने प्रयत्न करू या, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्य्नत केला.
 
राज्यातील 265 तालुक्यांत दुष्काळसदृश्य स्थिती आहे. या तालुक्यांतील शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी बारा उपाययाेजना व सवलती लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या तालुक्यांत तात्काळ पंचनामे सुरू करण्याचे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीबाबत विहित कार्यपद्धतीची पूर्तता झाल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे पंचनामे व पीक परिस्थितीचे अचूक सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया अचूक करण्यात येणार आहे. शेतकरी, विद्यार्थी, मजूर आणि नागरिकांना आवश्यक त्या सवलती व सुविधा वेळेत उपलब्ध करून देत दुष्काळी परिस्थितीचा परिणाम कमी करण्यासाठी शासनाने विविध पातळ्यांवर उपाययाेजना सुरू केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.