मुंबई, 27 सप्टेंबर (आ.प्र.) :
राज्यातील पावसाचा दीर्घ खंड आणि त्याचा शेतीवर झालेला परिणाम लक्षात घेऊन खरिपात ट्रीगर 1 लागू झालेल्या 265 तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले. राज्यातील एकूण 358 तालुक्यांपैकी 265 तालुक्यांचा समावेश या निर्णयात असून, दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार पुढील उपाययाेजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या डाेळ्यांसमाेर उभे पीक हातातून जाताना पाहणे वेदनादायी आहे. त्यामुळे केवळ दुष्काळ जाहीर करून थांबायचे नाही, तर शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष मदत पाेहाेचवायची आहे, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी हिताचा हा निर्णय घेण्यात आल्याबद्दल भरणे यांनी त्यांचे आभार मानले. पीक नुकसानीचे पंचनामे अचूक व पारदर्शकपणे करण्याचे, पीक कापणी प्रयाेग तातडीने राबवण्याचे; तसेच शेतकऱ्यांना पीकविमा व शासनाच्या विविध याेजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यवाहीचे निर्देश भरणे यांनी दिले आहेत. ठाणे विभागातील 5 जिल्ह्यांतील 12 तालुके, नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांतील 49 तालुके, पुणे विभागातील 5 जिल्ह्यांतील 35 तालुके, छत्रपती संभाजीनगर विभागातील 8 जिल्ह्यांतील 74 तालुके, अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांतील 56 तालुके आणि नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांतील 39 तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश करण्यात आला. या 265 तालुक्यांत जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपांच्या वीजबिलात सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी; तसेच राेजगार हमी याेजनेंतर्गत अधिकाधिक कामे सुरू करण्यासाठी निकषांत शिथिलता देण्यात येणार असल्याचे भरणे यांनी सांगितले. पीक नुकसानीबाबतची प्रत्यक्ष मदत मात्र विहित कार्यपद्धती पूर्ण केल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येईल. त्यामुळे पंचनामे, पीकस्थितीचे छायाचित्रण आणि जीपीएस नाेंदणीची कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचेही भरणे यांनी सांगितले.