त्याला एकदा आईची आठवण झाली की, साक्षात ब्रह्मदेव किंवा लक्ष्मी यांनी त्याची समजूत घालावयाचा आटाेकाट प्रयत्न केला तरी ताे व्यर्थ हाेताे आणि आपली मायमाऊली भेटल्याशिवाय त्याचा जीव समाधानी हाेऊन शांत हाेत नाही.
थाेड्नयात तारुण्य येण्यापूर्वीच्या बालवयात आई ही मुलांचे जणू जीवनच असते. कवी फ. मुं. शिंदे यांनी अगदी अलीकडे एका सुरेख कवितेत आईचे वर्णन ‘‘दुधावरची साय असते । वासराची गाय असते’’ असे यथार्थतेने केले आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी श्रीसमर्थांची काव्यकळा असेच लाेभस रूप घेते आणि म्हणते की, त्याला आपली आईच सर्वसुखाचे निधान असते.
तिच्यापासून दूर झाले तर त्याला तळमळ लागते. अशी त्या लेकराची आईवर पराकाष्टेची श्रद्धा, प्रेम आणि माया असते. मातृत्व हे सर्वच संतांनी सदैव महन्मंगल मानले आहे आणि प्रत्येक लहान मुलाची आईबद्दल अशीच पराकाेटीची प्रेमभावना असते; आणि ती अनुपमेयच असते।
- प्रा. अरुण गाेडबाेले,
माे. 9822016299