दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा : शनिवारपर्यंत प्राथमिक अधिसूचना काढणार

    24-Sep-2026
Total Views |

CMFadanvis 
मुंबई, 23 सप्टेंबर (आ.प्र.) :
राज्यातील काही भागातील दुष्काळसदृश परिस्थितीवर उपायाेजनांसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात येणार आहे, अशी घाेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
 
दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांना मदतीसाठी केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासनाकडून मदत केली जाईल; तसेच दुष्काळासंदर्भात येत्या शनिवारपर्यंत प्राथमिक अधिसूचना जारी केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पावसाचे प्रमाण, धरणांतील पाणीसाठा, शेतीच्या स्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील दुष्काळासंदर्भातील प्राथमिक माहिती घेतली जात आहे. या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना मदतीसाठी गतीने निर्णय घेता यावेत यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात येणार आहे.
 
मुख्य सचिव राजेश अग्रवाल या समितीचे सदस्य सचिव असतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी चारा यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
 
आगामी सात ते आठ महिन्यांचे नियाेजन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात नजीकच्या काळात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विक्रमी पदांची भरती केली जाईल. स्पर्धा परीक्षेबाबत अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील समिती विद्यार्थी आणि इतर संबंधितांशी संवाद साधत आहे.
 
समितीच्या अहवालाच्या शिफारशीबाबत शासन सकारात्मक असेल. गट-क वर्गाबाबत पदांची संख्या अल्प असल्याची तक्रार हाेते. नजीकच्या काळात गट वर्गाबराेबरच सर्व संवर्गातील पदे विक्रमी प्रमाणावर भरण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदभरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था राबवण्याचा किंवा ही भरतीही एमपीएससीमार्फत करण्याचा निर्णयही लवकरच घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.