अत्याधुनिक व्होल्वो बस एसटीच्या ताफ्यात येणार

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती : प्रवाशांना मिळणार अत्याधुनिक दर्जेदार सुविधा

    23-Sep-2026
Total Views |
 
VolvoBus
मुंबई, 22 सप्टेंबर (आ.प्र.) :
एसटी महामंडळाने आता लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासाच्या क्षेत्रात नवी झेप घेण्याची तयारी केली आहे. खासगी आराम बससेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी लवकरच महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या 200 अत्याधुनिक, वातानुकूलित व्हाेल्वाे बस दाखल करण्यात येणार आहेत. सुरक्षितता, आरामदायीपणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार प्रवासी सेवेचा संगम या नव्या सेवेत पाहायला मिळणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. विशेष म्हणजे एवढ्या माेठ्या प्रमाणात पहिल्यांदाच एसटीच्या ताफ्यात व्हाेल्वाे बस दाखल हाेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
अडीचशे किमीपेक्षा अधिक अंतराच्या किमान पाच ते सहा तासांच्या प्रवासासाठी आरामदायी 45 आसनी बस, तर रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी 30 किंवा 45 शयनयान क्षमतेच्या बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवसा तसेच रात्री प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार प्रवासाचा पर्याय उपलब्ध हाेईल.
 
नव्या आराम बससेवेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांना डिजिटल पद्धतीने सहज आरक्षण करता येणार आहे. एसटीच्या अधिकृत ऑनलाइन आरक्षण व्यवस्थेबराेबरच खासगी डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफाॅर्मवरूनही या बसचे तिकीट आरक्षित करण्याची सुविधा देण्याचा महामंडळाचा मानस आहे. माेबाइलवरून बसची वेळ, मार्ग आणि उपलब्ध आसनांची माहिती घेऊन घरबसल्या आरक्षण करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवाशांच्या सेवेसाठी हे घाेषवाक्य अधिक व्यापक स्वरूपात प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.