मुंबई, 22 सप्टेंबर (आ.प्र.) :
जागतिक राेजगाराच्या बदलत्या गरजांनुसार राज्यातील युवक-युवतींना काैशल्य आणि भाषा प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय राेजगारासाठी सक्षम करण्यात येत आहे. विविध देशांची कुशल मनुष्यबळाची गरज ओळखून देशनिहाय स्किल पासपाेर्ट तयार करावा. औद्याेगिक प्रशिक्षण संस्था आणि अन्य प्रशिक्षण संस्थांनी अभ्यासक्रम अद्ययावत करावा; तसेच राज्यासाठी जागतिक कार्यबल गतिशीलता धाेरणांतर्गत परदेशातील राेजगारांसाठी सुरक्षित भरती व्यवस्था विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृहात आयाेजित आंतरराष्ट्रीय कामगार गतिशीलतेवरील एकदिवसीय उच्चस्तरीय परिषदेत मुख्यमंत्री बाेलत हाेते. महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फाॅर ट्रान्सफाॅर्मेशन (मित्रा), राजशिष्टाचार विभाग, काैशल्य विकास विभाग आणि महाराष्ट्र एजन्सी फाॅर हाेलिस्टिक इंटरनॅशनल माेबिलिटी अँड अँडव्हान्समेंट (महिमा) यांनी संयु्नतपणे ही परिषद आयाेजिली हाेती. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, काैशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लाेढा, जर्मनीचे वाणिज्यदूत क्रिस्टाॅफ हेलियर, जपानच्या साताे हिताेमी, फ्रान्सचे पॅट्रीक लिवेरिनाे, रशियाचे इव्हाॅन पेटीसाेव, इंग्लंडचे जाॅन निकेली, ‘मित्रा’चे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, केंद्रीय काैशल्य विकास विभागाचे अपर मुख्य सचिव निरंजन कुमार सुधांशू, राष्ट्रीय काैशल्य मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुणकुमार पिलाई, आयु्नत डाॅ. अमित सैनी, राजशिष्टाचार विभागाचे सचिव राजेश गवांडे, ‘मित्रा’चे सहसचिव अमन मित्तल आणि आंतरराष्ट्रीय राेजगार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित हाेते
.
भारताने सुमारे 28 देशांसाेबत कामगार गतिशीलतेसंदर्भात करार केले आहेत. या देशांमध्ये अभियांत्रिकी, आराेग्यसेवा, बांधकाम आणि विविध तांत्रिक क्षेत्रांतील कुशल मनुष्यबळाला माेठी मागणी आहे. जागतिक आर्थिक मंचाच्या फ्युचर ऑफ जाॅब्स रिपाेर्ट 2025 नुसार 2030 पर्यंत जगभरात सुमारे 17 काेटी नवीन राेजगार निर्माण हाेतील, तर सुमारे 9 काेटी 20 लाख राेजगार विस्थापित हाेण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय कार्यबल गतिशीलतेच्या क्षेत्रात पुढाकार घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील युवक-युवतींना परदेशातील राेजगार संधी सुलभ व्हाव्यात आणि भाषिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी केंद्राचा डिजिटल इंडिया भाषिणी, मित्रा आणि महिमा यांच्यात सामंजस्य करार झाला. भाषांतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उमेदवारांना परदेशी आणि व्यवसायनिहाय भाषांचे माेफत व सुलभ प्रशिक्षण मिळणार असून, या प्रायाेगिक प्रकल्पाचा औद्याेगिक प्रशिक्षण संस्था आणि तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांना लाभ हाेईल.