मुंबई, 20 सप्टेंबर (आ.प्र.) :
मुंबईला जागतिक दर्जाचे ज्ञान, नवाेपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचे केंद्र बनवण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (यूडब्ल्यूए) इंडिया, मुंबई कॅम्पसच्या उद्घाटनामुळे नवे बळ मिळणार आहे.
जागतिक दर्जाच्या संस्था, पायाभूत सुविधा आणि प्रतिभावान मनुष्यबळाच्या माध्यमातून भविष्यातील उद्याेग व संशाेधन परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यूडब्ल्यूए इंडिया, मुंबई कॅम्पसचे उद्घाटन झाले. यावेळी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर राॅजर कूक, यूडब्ल्यूएच्या चॅन्सलर डाॅ. डायन स्मिथ-गँडर, कुलगुरू प्रा. अमित चकमा, विद्यापीठाचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित हाेते. यूडब्ल्यूएचा मुंबई कॅम्पस विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षण, संशाेधन, उद्याेग सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून देईल; तसेच भारत आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील ज्ञान, नवाेपक्रम आणि काैशल्य विकासावर आधारित सहकार्याला अधिक बळकटी देईल, असा विश्वास कूक यांनी व्य्नत केला. मुंबई आणि चेन्नई कॅम्पससाठी सुमारे 80 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डाॅलर्सची गुंतवणूक करण्यात आल्याचे डाॅ. स्मिथ-गँडर यांनी सांगितले.