सांगली, 20 सप्टेंबर (आ.प्र.) :
सांगली संस्थानच्या गणेशमूर्तीचे शाही परंपरेनुसार मिरवणुकीने कृष्णेवरील सरकारी घाटावर विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा माेरया...च्या जयघाेषाने परिसर दुमदुमून गेला हाेता. सूर्यास्ताच्या वेळी भ्नितमय वातावरणात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
दरबार हाॅलमध्ये विजयसिंहराजे पटवर्धन, महाराणी राजलक्ष्मी पटवर्धन, युवराज आदित्यराजे आदींसह मानकऱ्यांसमवेत दुपारी गणेशाची विधिवत आरती करण्यात आली. त्यानंतर सजवलेल्या रथातून गणेशमूर्तीची शाही मिरवणूक काढण्यात आली. गणेश दुर्गापासून सुरू झालेली मिरवणूक राजवाडा चाैक, पटेल चाैक, गणपती पेठ, गणेश मंदिर, टिळक चाैक मार्गे कृष्णेवरील सरकारी घाटावर पाेहाेचली. पारंपरिक राजेशाही थाटात निघालेल्या या मिरवणुकीचे दर्शन घेण्यासाठी शहरातील नागरिक व भाविकांनी माेठी गर्दी केली हाेती.
सूर्यास्तावेळी संस्थान गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर अनेक घरगुती गणेशाचे विसर्जन करण्यासाठी नदीकाठी नागरिकांची गर्दी उसळली हाेती. या ठिकाणी महापालिकेने निर्माल्य कुंड, मूर्तीदान केंद्र सुरू केले असून, नदी प्रदूषण टाळण्याचे आवाहन महापालिकेचे कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते करत हाेते. मिरजेतही सायंकाळी गणेश तलावात घरगुती गणेश विसर्जनासाठी माेठी गर्दी झाली हाेती.