जागतिक वारसास्थळ कास पुष्प पठार पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

निसर्गानुभवाला विविध रंगी फुलांच्या बहराचा अनोखा साज

    21-Sep-2026
Total Views |

KasPathar 
सातारा, 20 सप्टेंबर (आ.प्र.) :
जागतिक वारसास्थळ असलेल्या कासच्या पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू झाल्याने शनिवार, रविवारी हजाराे पर्यटकांनी या पठाराला भेट दिली.
 
सध्या फुलांसाठी वातावरण पाेषक असल्याने पठार अनेकविध फुलांनी बहरू लागले आहे. त्यामुळे देश- विदेशातील पर्यटकांची कास पुष्प पठार पाहण्यासाठी गर्दी हाेत आहे.
 
पठारावरील गेंद, सीतेची आसवे, तेरडा, साेनकी, अबाेलीमा, अभाळी, नभाळी, मंजिरी, चवर, टूथब्रश, कापरू, पंद, भुईचक्र यासारखी अनेक फुले बहरली असून बहुतांश ठिकाणी लाल, निळ्या, पांढऱ्या रंगांचे छाेटेमाेठे गालिचे तयार झाले आहेत. पठारावरील नयनरम्य सुंदर फुले पाहण्यासाठी पर्यटकांची पावले या पठाराकडे वळू लागली आहेत.
 
सध्या जांभळ्या, पांढऱ्या, लाल रंगाची छटा पर्यटकांना दिसत असून, चाेहाेबाजूला हिरवागार निसर्ग, पावसाची अधूनमधून रिमझिम, गुलाबी थंडी, दाट धुके यामुळे पर्यटक कुटुंबासमवेत पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. शनिवार-रविवार गर्दी करण्यापेक्षा साेमवार ते शुक्रवार या काळात पठाराला भेट देऊन पर्यटकांनी कासच्या निसर्गाचा आनंद घ्यावा, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
 
कास पठारावरील महाबळेश्वरकडे जाणाऱ्या राजमार्गावरील तीन किमी. अंतरावर असणाऱ्या कुमुदिनी तलावात कुमुदिनी नावाची कमळे बहरण्यास सुरुवात झाली असून, तलाव असंख्य फुलांनी बहरलेला पाहावयास मिळत आहे. तलावात माेजता येणार नाही एवढी पांढरी शुभ्र कमळे फुललेली पाहण्यासाठी पर्यटक भेट देत आहेत.